पुणे : राज्यात गेल्या आठवड्यात सर्वच भागांत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणांमधील पाणीसाठा ८२ टक्क्यांवर पोहोचला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, कायमच दुष्काळाच्या छायेत असलेल्या मराठवाड्यात यंदा ७५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर राज्यातील २० मोठे प्रकल्पांमध्ये १०० टक्के भरले आहेत.राज्यातील नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोकण विभागात असलेल्या सर्वच धरणांचा पाणीसाठा सरासरीपेक्षा चांगलाच वाढला आहे. गेल्या वर्षी याच दिवशी राज्यात पाणीसाठा ७०.२३ टक्के होता. गेल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांत मुसळधार पावसामुळे धरणे तर भरलीच शिवाय अनेक नद्यांना महापूर आले. त्यामुळे या भागातील जनजीवन अत्यंत विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यात असलेल्या धरणांमध्ये सध्या ७५.६९ टक्के पाणीसाठा असून, मागील वर्षीपेक्षा हा साठा ४५ टक्क्यांनी जास्त आहे. मागील वर्षी याच दिवसात या भागातील धरणांमध्ये ३०.६४ टक्के एवढा कमी पाणीसाठा होता.सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागात ९१ टक्के इतका झाला आहे. त्या खालोखाल पुणे विभागात ८९ टक्के पाणीसाठा आहे. राज्यात जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे अगोदरच धरणांमध्ये असलेला पाणीसाठा हळूहळू कमी होऊ लागला होता. दरम्यान, जुलै महिन्यात उन्हाचा चटका वाढल्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्याचे बाष्पीभवन होण्याची प्रक्रिया वाढली होती. एक महिन्याच्या खंडानंतर राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. सर्व विभागांतील मोठ्या प्रकल्पांत ८९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्या वर्षी हाच साठा ७७.५२ टक्के इतका होता.
राज्यातील पाणीसाठा (टक्क्यांत)
विभाग---- आजचा ----गेल्या वर्षीचानागपूर ----७२.२७-----८०.९१अमरावती----८०.६२----६६.४५
छ. संभाजीनगर---७५.६९---३०.६४नाशिक ---- ७४.०४--६४.६१
पुणे ----८९.६५--८४.०१कोकण ----९१.४५--९०.७४एकूण -----८२.२०--७०.२३