पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल असलेल्या खटल्याची नियमित सुनावणी आता 'समन्स ट्रायल' म्हणून होणार आहे. गांधी यांच्या वकिलांनी या खटल्याची सुनावणी 'समरी ट्रायल'ऐवजी 'समन्स ट्रायल' म्हणून घ्यावी यासाठी केलेला अर्ज एमपी एमएलए न्यायालयाचे विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी मंजूर केला आहे.
हा खटला काही ऐतिहासिक प्रसंग व घटनांवर अवलंबून आहे. विनायक दामोदर सावरकर यांचे स्वातंत्र्य मिळविण्यात किती व कसे योगदान होते, त्यांनी किती पुस्तके लिहिली आहेत, त्यांचे मुस्लिमांविषयी काय विचार होते, ब्रिटिशांबरोबर त्यांचे संबंध कसे होते, अशा अनेक ऐतिहासिक घटनांवर व संदर्भात या खटल्यात बचाव पक्षाला उलट तपास घ्यावा लागणार आहे. त्या अनुषंगाने अजून बऱ्याच काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना न्यायालयासमोर येणे राहुल गांधी यांना नैसर्गिक न्याय मिळण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत.
म्हणून कायद्यातील तरतुदींनुसार या दाव्याची पुढील सुनावणी ‘समरी ट्रायल’ऐवजी ‘समन्स ट्रायल’ म्हणून घ्यावी. सद्य:परिस्थितीत न्यायालयात या खटल्याची नोंद न्यायालयाचे निबंधक यांनी चुकीने ‘समरी ट्रायल’ अशी चुकीची केली आहे, असा अर्ज गांधी यांचे वकील ॲड. पवार यांनी केला होता. या खटल्याची सुनावणी ‘समरी ट्रायल’ म्हणून घेतल्यास बचाव पक्षाला विस्तृत व सखोलपणे साक्षीदारांचा उलट तपास घेता येणार नसल्याचा युक्तिवाद ॲड. पवार यांनी केला होता. अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून राहुल गांधी यांचा अर्ज विशेष न्यायालयाने मंजूर केला आहे.
कागदपत्रे देण्याची बचाव पक्षाची मागणी
सात्यकी सावरकर यांनी न्यायालयात दाखल केलेली सर्व कागदपत्रे, राहुल गांधी यांनी लंडनमधील कार्यक्रमात केलेल्या भाषणाची सीडी, वर्तमानपत्र, पुस्तके, साक्षीदार यांची प्रतिज्ञापत्रे अशी सर्व कागदपत्रे आजतागायत बचाव पक्षाला हस्तांतरित केलेली नाहीत. सुनावणी सुरू होण्यापूर्वी ही सर्व कागदपत्रे बचाव पक्षाला हस्तांतरित करण्याचे आदेश न्यायालयाने फिर्यादी यांना द्यावेत, असा अर्ज ॲड. पवार यांनी केला आहे. त्यावर सात्यकी सावरकर यांचे लेखी म्हणणे न्यायालयाने मागितले आहे. या खटल्याची पुढील सुनावणी २५ एप्रिलला होणार आहे.