- उद्धव धुमाळे
पुणे : जर्मनी येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ टेनिस स्पर्धेत पुण्यातील २० वर्षीय वैष्णवी निहार आडकर या मुलीने कास्यपदक पटकावले. बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात बीबीए तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या वैष्णवीने या यशातून आई-वडिलांची मान तर उंचावली आहेच. त्याचबरोबर महाविद्यालय, विद्यापीठ आणि पुणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
वैष्णवीचा जन्म २००४ सालचा. वडील निहार हे बी.ई. सिव्हिल आणि एम.बी.ए. करून व्यवसायात उतरलेले, तर आई गौरी एम.ए. फाईन आर्ट करूनही स्वतःला कुटुंबात वाहून दिलेली गृहिणी. आडकर दाम्पत्याला दोन मुली. पहिली वैष्णवी आणि दुसरी अस्मी. दोघीही टेनिसमधील चॅम्पियन. वैष्णवीने वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षीच फिटनेसच्या दृष्टीने टेनिसचा श्रीगणेशा केला आणि त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. नवव्या-दहाव्या वर्षी स्पर्धांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सीरिजमधील १२ वर्षांखालील मुलींच्या गटाचे नेतेपद पटकावले आणि आत्मविश्वास वाढला. ती चौदा वर्षांखालील मुलींमध्ये 'एआयटीए' क्रमवारीत प्रथम स्थानावर पोहोचली.
वैष्णवी हिने सलग १४, १६ आणि १८ वर्षांखालील स्पर्धांमध्ये अव्वल स्थान कायम ठेवला आहे. आता जागतिक स्पर्धेतही कांस्यपदक मिळवून आपली यशस्वी घोडदौड कायम ठेवली आहे. शालेय शिक्षण अभिनव विद्यालयातून पूर्ण केले. पुढे अकरावी-बारावीचे शिक्षण सिंबायोसिस संस्थेत घेऊन पदवीसाठी तिने बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात प्रवेश घेतला. सध्या ती बी.बी.ए. तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. जागतिक स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ती प्रतिनिधित्व करत आहे. ती रोजच्या सरावातून आक्रमक, ताकदवान फटके मारते. ज्युनिअर गटात मुलींमध्ये वैष्णवी महाराष्ट्रात अव्वल असून, देशाच्या क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे.
वैष्णवी लहान असताना तिला कोणत्यातरी खेळात गुंतवावं म्हणून आम्ही टेनिस खेळात सहभाग घ्यायला लावला. यातील तिची आवड लक्षात आली आणि आम्ही प्रोत्साहन देत राहिलो. कोच म्हणून केदार शहा यांचे अमूल्य योगदान लाभले. आज जागतिक विद्यापीठ टेनिस स्पर्धेत कांस्यपदक मिळवून वैष्णवीने देशाची मान उंचावली आहे. अशीच ती उत्तरोत्तर प्रगती करत राहील. देशाला अनेक पुरस्कार मिळवून देईल, आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. - निहार आडकर, वैष्णवीचे वडील