बारामती : सणसर - गणरायाच्या आगमनाच्या दिवशी छत्रपती कारखान्याने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा कार्यक्रम घेतला आहे. भविष्यात हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च पाहता कृषिक्षेत्रात ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर गेम चेंजर ठरणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी शेतकरी मेळावा आणि कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. यावेळी उपमुख्यमंत्री पवार पुढे म्हणाले, ‘एआय’चा वापर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. त्यासाठी आजचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. या आयोजनाबद्दल संचालक मंडळाला धन्यवाद देतो. याच कारखान्यापासून माझी राजकीय कारकीर्द सुरू झाल्याने माझे या परिसराशी भावनिक नाते आहे.
कारखान्याला गतवैभव प्राप्त झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. हे काम मोठे जिकिरीचे आहे. मात्र, संचालक मंडळ साथ देत आहे. शिवाय राज्य सरकार, बँक स्तरावर आमची जबाबदारी पार पाडण्याचा आपल्यासह भरणे यांनी प्रयत्न केला आहे. कारखाना परिसरातील रस्त्यांच्या कामासाठी १० काेटींचा निधी मंजूर केल्याची घोषणा उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. पुढील काळात कारखाना परिसराच्या विकासासाठी टप्प्याने आणखी निधी देण्यात येइल, असेदेखील पवार यांनी स्पष्ट केले. शेती आपण ‘स्मार्ट’ करू शकल्यास शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध होईल. तंत्रज्ञानाचा वापर करणाराच भविष्यात साक्षर ठरेल.
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कायम पाठीशी राहू, वडीलधाऱ्यांनी उभा केलेला कारखाना देशात पुढे नेऊ, असे पवार म्हणाले. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकरी हितासाठी राज्य सरकार चांगले निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. भरघोस उत्पादनासाठी शेतात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे. ठिबक सिंचनाचे उर्वरित अनुदान पुढील महिन्यात जमा होणार असल्याचे भरणे म्हणाले. कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी भविष्यातील शेतीसंकटावर मात करण्यासाठी ‘एआय’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे मत व्यक्त केेले.
‘छत्रपती’चे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह शेतकरी सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ करू, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी ‘एआय’ महत्त्वपूर्ण असल्याचे जाचक म्हणाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी विकास प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र पवार, कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास गावडे, माजी चेअरमन प्रशांत काटे, संचालक रामचंद्र निंबाळकर, पृथ्वीराज घोलप, शिवाजी निंबाळकर, सणसरचे सरपंच यशवंत नरुटे, यांच्यासह सर्व संचालक, पदाधिकारी उपस्थित होते.