पुणे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतूक करून घेतले, मात्र भारतीय मालावर तब्बल २७ टक्के जास्तीचा कर लादून ट्रम्प यांनी मोदी यांचे विकेट घेतली असल्याची टीका काँग्रेसचे माजी आमदार अनंत गाडगीळ यांनी केली. यातून भारताचे फार मोठे नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.ट्रम्प व मोदी यांच्यातील चर्चा फलदायी, सकारात्मक, समाधानकारक झाल्याचे मोदी यांच्या भक्तांकडून वारंवार सांगण्यात येते. परराष्ट्रखाते, अर्थखाते यात आघाडीवर होते. खुद्द ट्रम्प यांनीही मोदी, माय फ्रेंड असे वक्तव्य केल्याने तर सगळे भक्त जमीनीपासून वर तरंगत होते. प्रत्यक्षात मात्र ट्रम्प यांनी भारतातून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या मालावर २७ टक्के कर लावला. एवढेच नव्हे तर ट्रम्प यांनी भारताला जगातील इतर १३८ देशांच्या यादीत बसविले. भारतासाठी हा अपमानही आहे असे गाडगीळ म्हणाले.भारतातून अमेरिकेला निर्यात होणाऱ्या मालाची सरासरी उलाढाल अंदाजे ११ हजार कोटीच्या (१५ बिलियन डॉलर्स) पुढे आहे. याउलट अमेरिकेतून भारतात आयात केल्या जाणाऱ्या मालाची उलाढाल ४ हजार कोटीच्या जवळपास आहे. मागील काही वर्षे भारत अमेरिकेत अभियांत्रिकी क्षेत्रात अंदाजे ७ हजार कोटी, दागिने ५ हजार कोटी, पेट्रोलियम ५ हजार कोटी निर्यात करतो आहे. या आकडेवारीवरून भारताचे किती मोठे आर्थिक नुकसान होणार आहे याची कल्पना येते असे गाडगीळ यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयाचे प्रामुख्याने भारताच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहेत अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
करभार लावून ट्रम्प यांनी घेतली मोदींची विकेट; काँग्रेसची टीका
By राजू इनामदार | Updated: April 3, 2025 20:47 IST