९ कोटी १६ लाखांच्या निविदेला स्थायीची मंजुरी
पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याकडून मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौक ते आई माता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार कमी करण्यासाठी ९ कोटी १६ लाख ९९ हजार रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. या रस्त्याची एकूण लांबी ६०० मीटर आहे. त्यापैकी ५०० मीटरमधील चढ कमी केला जाणार आहे. या निविदेत पाण्याची लाईन, पावसाळी आणि सांडपाणी वाहिन्या टाकण्याचा समावेश आहे.
दक्षिण भागात लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने पर्यायी मार्ग म्हणून या रस्त्यावर दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. बिबवेवाडी काकडे वस्ती, आई माता मंदिर ते गंगाधाम चौक रस्त्यावरील आई माता चौकात भरधाव ट्रकने महिलेला चिरडल्याची घटना घडली होती. यानंतर महापालिका व पोलिसांबद्दल संताप व्यक्त केला जात होता. त्यानंतर महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून तातडीच्या व दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा केली होती. त्यामध्ये वाहतूक पोलिसांनी या मार्गावर दिवसा जड वाहतुकीला बंदी घातली आहे. तर महापालिका प्रशासनाने टेकडीवरून येणाऱ्या रस्त्याचा तीव्र उतार कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे प्रामुख्याने आई माता मंदिर ते एमटीएम मार्केट दरम्यानचा हा रस्ता असेल. या रस्त्याला अन्य नऊ रस्ते येऊन मिळतात. या कामासाठी पुणे महापालिकेने निविदा काढली होती. त्यासाठी आठ निविदा आल्या होत्या. त्यापैकी दोन जण अपात्र ठरले. त्यात सर्वात कमी दराची म्हणजे पूर्वगणनपत्रकापेक्षा २० टक्के कमी दराने ९ कोटी १६ लाख ९९ हजार रुपयांच्या निविदा आली होती. या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.