पुणे : शहरातील अनेक रस्त्यांवर विविध ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे बॉटलनेक तयार झाले आहेत. यामुळे शहरात विविध भागांत वाहतूककोंडी होत आहे. ही वाहतूककोंडी सुटण्यासाठी पुढील दोन महिन्यांत मध्य शहरातील रस्ते बॉटलनेकमुक्त करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला आहे. दोन महिन्यानंतर महापालिका हद्दीत समावेश झालेल्या ३२ गावांमधील रस्त्यांवर काम करण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखवला.
रस्त्यावर पडणारे खड्डे, रस्त्यांवर साचणारे पावसाचे पाणी, रस्त्याच्या दुतर्फा होणारी चारचाकी व दुचाकींची अनधिकृत आणि रस्ते व पदपथांवर झालेले अतिक्रमण, पथारी व फेरीवाले आदीमुळे शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी होते. हे जसे चित्र वाहतूककोंडीस कारणीभूत आहे. तसेच रस्त्याची बॉटलनेट स्थितीही कोंडीस कारणीभूत आहे. भूसंपादन आणि अतिक्रमण या दोन कारणांमुळे शहरातील अनेक रस्त्यांवर बॉटलनेक तयार झाले आहे. रुंद रस्ता एखाद्या ठिकाणी एकदमच अरुंद होत असल्याने अशा ठिकाणी बॉटलनेक तयार होऊन वाहनांच्या रांगा लागतात. अनेक ठिकाणी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बॉटलनेक तयार झाले आहेत.
पुणेकरांना वाहतूककोंडीतून दिलासा देण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विविध उपाय योजना करण्याचे नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून आयुक्तांनी पुढील दोन महिन्यांत मुख्य शहर बॉटलनेक मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. दोन महिन्यांत मुख्य शहरातील काम करून पुढील काळात महापालिका हद्दीत समावेश झालेल्या ३२ गावांमधील रस्त्यावर आपले लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले आहे. यासाठी आयुक्तांनी शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि वाहतूककोंडी होणाऱ्या २२ ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा अहवाल मंगळवारपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. या पाहणीत वाहतूककोंडीची कारणे शोधण्याच्याही सूचना केल्या आहेत.
शहरात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी वाहतूक समस्या निर्माण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे वाहतूककोंडी होण्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन कोंडीची काणे शोधण्याच्या सूचना केल्या आहेत. या कारणांचा अहवाल आल्यानंतर पुढील दोन महिन्यांत मुख्य शहर बॉटलनेकमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर समाविष्ट गावांतील रस्ते दुरुस्त व मोकळे करण्याचे काम हाती घेतले जाईल. - नवल किशोर राम, महापालिका आयुक्त.