स्थायी समितीमध्ये निविदांचा पाऊस;स्थायीत १५० कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी
By राजू हिंगे | Updated: March 21, 2025 19:06 IST2025-03-21T19:05:29+5:302025-03-21T19:06:13+5:30
- ११२ विषय मंजूर, ऐनवेळी ८९ विषय दाखल मान्य

स्थायी समितीमध्ये निविदांचा पाऊस;स्थायीत १५० कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी
पुणे : आर्थिक वर्षातील शेवटच्या स्थायी समितीमध्ये पाणी, घनकचरा, उद्यान, रस्ते, समाज विकास विभाग, शिक्षण विभाग यासह समाविष्ट गावामधील विविध विकासकामांच्या सुमारे १५० कोटींच्या ११२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. विविध विकासकामांचा निधी वाया जाऊ नये यासाठी पालिका प्रशासनात गेल्या दोन दिवसांपासून स्थायी समितीला प्रस्ताव आणण्यासाठी लगीनघाई सुरू होती. या बैठकीत ऐनवेळी ८९ विषय दाखल करून मान्य करण्यात आले.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीच्या कार्यपत्रिकेवर २३ विषय होते. पीएमपीएमएलला विद्यार्थी पाससाठी निधी देणे, घनकचरा विभाग, टँकरने पाणीपुरवठा करणे, महिला दिनानिमित आयोजित कार्यक्रमाचे बिल देणे याचा समावेश होता.
या बैठकीत ऐनवेळी ८९ प्रस्ताव दाखल मान्य करण्यात आले. त्यात उरूळी देवाची येथे पाण्याचे टँकर देणे, पीएमपीएलसाठी इलेक्ट्रिक चॉर्जिग स्टेशन, शहरातील विविध पुलांवर मायक्रो सर्पसिंग करणे, स्वच्छसाठी बकेट खरेदी करणे, क्षयरोग रुग्णांना मोफत पोषक आहार पुरविणे, विविध भागांतील ड्रेनेज लाईनची कामे करणे यासह विविध कामांचा समावेश आहे. धायरी, नऱ्हे, नांदोशी, सणसवाडी, किरकिटवाडी या गावातील विकासकामांबाबत प्रस्ताव हाेते. पुणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने बालवाडी, शाळामध्ये विविध सोयीसुविधा देण्याबाबतचे प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली.
कार्यपत्रिकेपेक्षा दाखल मान्यचे प्रस्ताव अधिक
शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा किंवा तातडीचा विषय असेल तर तो स्थायी समितीच्या बैठकीला आयत्यावेळी दाखल करून मान्य करण्यात येतो. मात्र, या नियमाचा आता दुरुपयोग केला जात आहे. स्थायी समितीच्या कार्यपत्रिकेवर महत्त्वाचे विषय आणले तर त्याची चर्चा होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून स्थायी समितीमध्ये दाखल मान्य विषय आणण्याचे प्रमाण अधिक वाढले आहे.