पुणे : सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवात सात दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी दिली. त्यावर आम्हाला विश्वासात न घेताच अशी परवानगी का दिली? असा सवाल एका ८० वर्षांच्या पुणेकर विलास लेले यांनी मंत्री शेलार यांना केला आहे. त्याशिवाय त्यांना याचे उत्तर देण्यास भाग पाडावे म्हणून एक स्वतंत्र विनंतीपत्रही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.
कोणत्याही ध्वनिक्षेपकाला रात्री १० नंतर वाजवण्यास सर्वोच्च न्यायालयानेच बंदी घातली आहे. विशिष्ट डेसिबलपर्यंतच ध्वनीची मर्यादाही घालून दिली आहे. त्यात राज्य सरकारने बदल करून काही वर्षांपूर्वी उत्सवातील अखेरचे तीन दिवस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी दिली. ती त्यानंतर ५ दिवस करण्यात आली व आता तर ध्वनिक्षेपक रात्री १२ वाजेपर्यंत वाजवण्यास ७ दिवस परवानगी दिली आहे.
लेले यांनी म्हटले आहे की, आधीच दहीहंडी व अन्य उत्सवांमध्ये आमची स्थिती जगतो की वाचतो अशी होते. त्यात आता लेसर दिव्यांची भर पडली आहे. कल्याणकारी राज्य म्हणून या अनिष्ट व उत्सवाशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टींना आळा घालण्याचे सोडून सरकारच त्याची तरफदारी करते आहे, हे अयोग्य आहे. कोणीही मागितली नसताना ७ दिवसांची परवानगी दिली गेली. यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन आहे. शेलार यांनी याचे उत्तर द्यावे व ते न देतील तर त्यांना उत्तर देण्यास भाग पाडावे, अशी मागणी लेले यांनी आपल्या पत्रात केली आहे.