सोमेश्वरनगर : शासनाच्या नियमानुसार चालू गाळप हंगामासाठी श्री सोमेश्वर कारखान्याचा रास्त व किफायतशीर दर (एफ. आर. पी.) ३,२८५ रुपये प्रतिटन इतका निश्चित करण्यात आला आहे. संचालक मंडळाने प्रथम हप्त्यापोटी ३,३०० रुपये प्रतिटन देण्याचा निर्णय घेतला आहे.
दि. १ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत आलेल्या गळीतास उसाची प्रथम हप्त्याप्रमाणे रक्कम ऊसउत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये दि. २९ नोव्हेंबरला वर्ग करण्यात आली, असे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी माहिती दिली. आजपर्यंत कारखान्याने ३,०१,७६० मे. टनाचे गाळप पूर्ण केले असून, जिल्ह्यातील उच्च साखर उतारा राखत यावेळी ३,१४,९५० साखर पोत्यांचे उत्पादन झाल्याचेही अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.
जगताप म्हणाले की, राज्य शासनाच्या निर्णयानुसार गळीतास आलेल्या उसाची किमान आधारभूत किंमत (एफ. आर. पी.) १४ दिवसांत ऊसउत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणे बंधनकारक आहे. मात्र सुरुवातीच्या कालावधीत प्रथम हप्त्याच्या देयकासाठी उशिरा निर्णय झाल्यामुळे त्यावर १५ टक्के व्याज देणे आवश्यक होते. दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी संचालक मंडळाच्या निर्णयानुसार ही व्याज रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये हंगाम २०२१-२०२२ मधील १ कोटी १० लाख रुपये जानेवारी २०२३ मध्ये तसेच उर्वरित हंगाम २०२२-२०२३ मधील २३ लाख ९० हजार रुपये, हंगाम २०२३-२०२४ मधील ४० लाख ६८ हजार रुपये व हंगाम २०२४-२०२५ मधील ६४ लाख ५८ हजार रुपये अशी एकूण १ कोटी २९ लाख रुपये व्याज रक्कम दि. २ डिसेंबर २०२५ रोजी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. राज्यात उशिरा दिलेल्या एफ. आर. पी. वरील व्याजाची रक्कम देणारा सोमेश्वर हा कदाचित एकमेव कारखाना असल्याचेही जगताप यांनी सांगितले.
कारखान्याने हंगाम २०२१-२०२२ मध्ये एफ.आर.पी.पेक्षा प्रति मे. टन २१८.३७ रुपये जास्त म्हणजे २८.९४ कोटी रुपये, हंगाम २०२२-२०२३ मध्ये प्रति मे. टन ४९९.५१ रुपये जास्त म्हणजे ६२.७७ कोटी रुपये, हंगाम २०२३-२०२४ मध्ये प्रति मे. टन ६९७.०२ रुपये जास्त म्हणजे १०२.११ कोटी रुपये व हंगाम २०२४-२०२५ मध्ये प्रति मे. टन २२६.९४ रुपये जास्त म्हणजे २५.२३ कोटी रुपये देऊन आहेत. सोमेश्वर कारखाना गेल्या ९ वर्षांपासून एफ.आर.पी.पेक्षा जास्त दर देत आहे आणि यावर्षीदेखील जास्त ऊस दराची परंपरा कायम राखणार असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
Web Summary : Someshwar factory paid farmers ₹1.29 crore interest for delayed FRP payments. The factory consistently pays more than FRP for sugarcane, continuing a 9-year tradition of higher rates, benefiting sugarcane farmers.
Web Summary : सोमेश्वर चीनी मिल ने एफआरपी भुगतान में देरी के लिए किसानों को ₹1.29 करोड़ ब्याज दिया। मिल लगातार गन्ने के लिए एफआरपी से अधिक भुगतान करती है, जिससे गन्ना किसानों को लाभ होता है, और उच्च दरों की 9 साल की परंपरा जारी है।