कोळवण ( पुणे जि. ) - काही दिवसांपूर्वी यवत जवळील चौफुला भागातील एका कला केंद्रावर झालेल्या गोळीबार प्रकरणात भोर-राजगड-मुळशी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ कैलास मांडेकर यांचा सहभाग असल्याचे समोर आले होते.
या घटनेनंतर मांडेकर यांच्या भावावर टीकेची झोड उठली होती. तर पत्रकारांनी मांडेकर यांना देखील धारेवर धरले होते. याच पार्श्वभूमीवर, वारकरी संप्रदायाच्या उपस्थितीत वाढदिवसाच्या कार्यक्रमात भाषण करताना शंकर मांडेकर भावूक झाले. त्यांनी आपल्या भावाच्या चुकीबद्दल सार्वजनिकरित्या माफी मागत वारकरी समाजाला आश्वासन दिले की, भविष्यात अशी चूक पुन्हा होणार नाही. यावेळी त्यांची पत्नीही अश्रू अनावर झाली.
मांडेकर म्हणाले, मी स्वतः वारकरी नाही, पण वारकऱ्यांनी आणि माळकरांनी माझ्यावर संतांसारखे प्रेम केले आहे. चुकीच्या घटनेनंतर वारकरी बंधूंनी मला फोन करून सांगितले की, ज्याने चूक केली त्याच्याविरुद्ध कारवाई ते करतील, तुम्ही तुमचं काम करत राहा. त्या विश्वासाबद्दल मी ऋणी आहे.
ते पुढे म्हणाले, जे चुकीचं करतात त्यांना समाजातून मुळासकट उपटून टाकलं पाहिजे. समाजाला लागलेली ही कीड मी नष्ट करण्याचे काम करतो आहे. वारकऱ्यांचा मान कमी होईल असे कधीच वागणार नाही, याची ग्वाही देतो.
मांडेकर यांनी या प्रसंगी विरोधकांच्या टीकेवर भाष्य करत काही नेत्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. "नेत्यांनी स्पष्ट सांगितले, चुकी नसेल तर दोषी धरणार नाही. हीच ताकद घेऊन मी पुढे काम करणार आहे. असे ते म्हणाले.