पुणे : स्मार्ट वीज मीटर बसवून पुणेकरांची सात महिन्यांत साडेआठ कोटी रुपयांची बचत झाली असली तरी जुलैपासूनच नव्या करारानुसार घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात ३५ पैसे प्रतियुनिट इंधन अधिभार लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला प्रतिमहिना ७ कोटींची कात्री लागली आहे. ही दरवाढ ४ टक्के असून, याकडे महावितरणने सोयिस्करपणे चुप्पी साधली आहे. साडेआठ कोटींची बचत ही महावितरणची आकड्यांची चलाखी असल्याचा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे.
महावितरणने पुण्यातील २५ टक्के ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्यामुळे त्यांचे ७ महिन्यांत एकूण साडेआठ कोटी रुपये वाचल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी (दि. १८) प्रकाशित केले होते. महावितरणच्या या गणितानुसार ग्राहकांचे प्रतिमहिना सव्वाकोटी रुपये बचत होत आहे. याबाबत वेलणकर म्हणाले की, पुण्यातील सर्वच अर्थात १०० टक्के ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्यास प्रतिमहिना ४ कोटी रुपये वाचले असते. स्मार्ट मीटर बसवलेल्या घरगुती ग्राहकाला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत जेवढी वीज वापरली त्यावर ८० पैसे प्रतियुनिट सूट दिली जाते. मात्र, बहुतांश घरांमधील नागरिक याच काळात कामावर जातात आणि या वेळेतील वापरच मुळात कमी असतो. त्यामुळे महावितरणने दिलेले बचतीचे आकडे फसवे आहेत.
पुणे परिमंडळाला मिळणारे मासिक वीजबिल साधारण एक हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. त्यातील २०० कोटी रुपयांचे बिल घरगुती ग्राहकांचे गृहित धरले तरी स्मार्ट मीटरमुळे बचत फक्त २ टक्के होत आहे. मात्र, याच जुलै २०२५ ते जानेवारी २०२६ या काळात महावितरणने सरासरी दरमहा ३५ पैसे प्रतियुनिट एवढा इंधन अधिभार लावला आहे. हा अधिभार पूर्ण दिवसाच्या वापरावर आहे. या अधिभारामुळे घरगुती ग्राहकांच्या खिशाला प्रतिमहिना ७ कोटी रुपयांची कात्री लागली आहे. या ग्राहकांचे वीजबिल ४ टक्क्यांनी वाढले आहे. मात्र, याविषयी महावितरणने सोयिस्करपणे चुप्पी साधली आहे, असा आरोप वेलणकर यांनी केला आहे.
लोकांनी स्मार्ट मीटर बसवावेत, यासाठी हा बचतीच्या आकड्यांचा खेळ करण्याची गरज नव्हती. महावितरणने नेमलेले कंत्राटदार ग्राहकांना न विचारता, प्रसंगी दमदाटी करून स्मार्ट मीटर बसवत आहेत. - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच, पुणे
Web Summary : Pune residents are experiencing a hidden electricity surcharge, negating smart meter savings. While smart meters saved ₹8.5 crore in seven months, a new fuel surcharge adds ₹7 crore monthly, a 4% increase, fueling criticism and accusations of deceptive tactics by the electricity provider.
Web Summary : पुणेवासियों को स्मार्ट मीटर बचत के बावजूद बिजली अधिभार का सामना करना पड़ रहा है। जहाँ स्मार्ट मीटर से सात महीनों में ₹8.5 करोड़ की बचत हुई, वहीं एक नया ईंधन अधिभार ₹7 करोड़ मासिक जोड़ता है, जो 4% की वृद्धि है, जिससे बिजली प्रदाता द्वारा भ्रामक रणनीति के आरोप लग रहे हैं।