घोडेगाव: आंबेगाव तालुक्यातील फुलवडे गावात दुर्मिळ कातळ शिल्पांचा शोध लागला आहे. या शिल्पांमध्ये गोलाकार रचना, मंकळा खेळाचा पट आणि विविध प्रकारचे नक्षीकाम आढळून आले आहे. जुन्नरी आंबेगाव कट्ट्याचे सदस्य अरविंद मोहरे, सागर हगवणे आणि मुन्ना उंडे यांनी ही माहिती दिली. या शोधामुळे फुलवडे परिसराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करण्यासाठी नवे दालन खुले झाले आहे.
फुलवडे गावचा परिसर पूर्वीपासूनच ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. गावातील औदुंबरेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी राज्यभरातून भाविक येतात. मंदिर परिसरात वीरगळ, स्मृती शिळा आणि चुन्याच्या घाण्याचे दगड पाहायला मिळतात. याशिवाय, या परिसरातील धबधबे आणि रिव्हर्स वॉटर फॉल हे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे. जुन्नर आणि आंबेगावला जोडणारी जुंदर वाटदेखील याच गावातून जाते.
या कातळ शिल्पांबाबत शिवनेर भूषण विनायक खोत यांनी सांगितले की, पूर्वीच्या काळी मंदिरे, लेणी आणि किल्ल्यांच्या परिसरात मंकळा खेळाचे अवशेष आढळतात. खडकांवर छोटे खड्डे कोरून तयार केलेला हा खेळ मनोरंजनासोबतच बुद्धीला चालना देण्यासाठी खेळला जात असे. या नव्या शोधामुळे फुलवडे गावाच्या ऐतिहासिक महत्त्वाला आणखी बळकटी मिळाली असून, पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि इतिहास संशोधकांसाठी हा परिसर अधिक आकर्षक ठरणार आहे.