पिंपरी : राज्यात सध्या डाळिंब उत्पादक शेतकरी सुखावले आहेत. बाजारात डाळिंबाला चांगला भाव मिळत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. बाजारात डाळिंब १५० ते २५० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. चांगल्या प्रतीच्या डाळिंबाला यापेक्षाही जास्त दर मिळत आहे. ही दरवाढ केवळ स्थानिक मागणीमुळे नसून, इतर जिल्ह्यांमधून येणाऱ्या कमी पुरवठ्यामुळे देखील आहे.
डाळिंबावरील फवारण्या, देखभालीचा खर्च जास्त
डाळिंबाचे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. बुरशीजन्य रोगांचा सामना करण्यासाठी नियमित आणि महागड्या फवारण्या कराव्या लागतात. छाटणी, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि इतर देखभालीचा खर्च असतो. वाढलेल्या मजुरीमुळेही हा खर्च वाढत आहे, ज्यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे.
कमी पाण्याचे पीक
डाळिंब हे तुलनेने कमी पाण्याची गरज असलेले पीक आहे, जे कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे डाळिंबबागांचे नुकसान झाले.
म्हणून क्षेत्रात झाली वाढ
पुणे जिल्ह्यात विशेषत: पुरंदर, शिरूर तालुक्यामध्ये डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. पारंपरिक पिकांना मिळणारा कमी भाव आणि डाळिंबाला मिळणारा चांगला दर यामुळे अनेक शेतकरी याकडे वळले आहेत.