पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने रंगेहाथ पकडले असून, त्याच्याकडून देशी बनावटीच्या तीन पिस्तुलांसह सहा काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई सोमवारी रात्री मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर करण्यात आली.
चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे (२७, रा. संतोषनगर, कात्रज) असे पोलिसांनी अटक केलेल्या सराईताचे नाव आहे. गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरात गस्त घालत हाेते. त्यावेळी वडगाव बुद्रूक परिसरात सराईत गुन्हेगार शेखर ठोंबरे थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलिस कर्मचारी दयानंद तेलंगे-पाटील यांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापळा लावून ठोंबरेला पकडले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे ७६,३०० रुपये किमतीची देशी बनावटीची तीन पिस्तुले तसेच सहा काडतुसे मिळून आली. तो पिस्तुलांची कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलिस कर्मचारी प्रवीण उत्तेकर, विनायक साळवे, दयानंद तेलंगे-पाटील, सर्जेराव सरगर, सचिन माळवे, संदीप शिर्के, मारुती पारधी, विशाल दळवी यांनी ही कारवाई केली.