पुणे: मी कोणाची जागा हडपली असा आरोप होतो आहे, पण त्यात तथ्य नाही. मी व माझे काही भागीदार आहेत. सर्व प्रकारची कायदेशीर मर्यादा पाळूनच आम्ही व्यवहार केले आहेत. भाजपातील काही लोकही यात भागीदार आहेत असा खुलासा काँग्रेसमधून शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केलेले माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी केला.भाजपच्या काहीजणांनी धंगेकर यांच्यावर त्यांनी व अन्य एका पक्षातील पदाधिकाऱ्याने वक्फ बोर्डाची जागा हडप करून तिथे इमारत उभी केल्याचा आरोप केला होता. काँग्रेस सोडल्यानंतर काँग्रेसकडूनही त्यांनी दुष्कर्मे केली व त्यातून वाचण्यासाठी त्यांना सत्तेजवळ जाणे गरजेचे होते अशी टीका करण्यात आली होती. धंगेकर यांनी याचा मंगळवारी याबाबत त्यांची बाजू स्पष्ट केली. भाजपवाले वक्फ बोर्डाच्या विरोधात बोलतात, एक हिंदू त्या बोर्डाची जागा घेतो व हे त्याच्या विरोधात जाऊन बोलतात, यातून त्यांचे हिंदुत्व तपासून घेण्याची गरज आहे. जे आरोप करतात त्यांचेच नातेवाईक या व्यवहारात आहेत. असल्या आरोपातून कोणाकोणाचा संसार उध्वस्त होईल याचा विचार आरोप करणााऱ्यांनी करावा असे धंगेकर म्हणाले.स्टिंग ऑपरेशन करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र त्यातही काही तथ्य नाही. माझे एक मित्र होते, त्यांचे काही वाद होते. त्यांच्यात मध्यस्थी घडवून आणण्याचा प्रयत्न होता. मी त्यात कोणाकडे काही मागितले हे सिद्ध करून दाखवावे, तसे काहीही नाही. त्यामुळे बोलणाऱ्यांनी काहीही बोलू दे, मला त्यांच्याविरोधात बोलायची गरज वाटत नाही. मला माझी उंची कमी करायची नाही. काँग्रेसमधून मी बाहेर पडलो, पण काँग्रेसवर किंवा त्यांच्या नेत्यांवर टीका केलेली नाही. मित्र, कार्यकर्तेच आपले असतात. त्यांचे म्हणणे ऐकणे गरजेचे असते. त्यामुळे मी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलो असे धंगेकर यांनी सांगितले.मी ज्या पक्षात होतो त्या पक्षाशी मी माझी बांधिलकी ठेवली. कधीही पक्षाच्या विरोधात काहीही केलेले नाही. मी मानवतावादी आहे, मानवतावाद माझ्यात ठासून भरला आहे. माझी बांधिलकी पुणेकरांबरोबर आहे. कोणाला त्रास देण्याचा माझा स्वभाव नाही. त्यामुळे माझ्याविरोधात कोणी काही बोलत असेल तर त्यांनी अजून बोलावे. त्यातून माझी प्रतिमा उजळच होईल. रस्त्यावर उतरून संघर्ष करणे हा माझा स्वभाव आहे. त्यामुळेच त्यासाठी मी कधीही तयार असतो असे धंगेकर म्हणाले.
'त्या' व्यवहारात भाजपातील लोकही माझे भागीदार; रविंद्र धंगेकर यांनी स्पष्टच सांगितलं
By राजू इनामदार | Updated: March 11, 2025 15:26 IST