वृत्तपत्र विक्रेता दिन : नितदिन आम्हा ध्यास वृत्तपत्रांचा
By राजू इनामदार | Updated: October 15, 2025 14:26 IST2025-10-15T14:26:13+5:302025-10-15T14:26:46+5:30
- अशा पहाटेच्या समयी ही सगळी फौज आपापले पेपर घेऊन निघते. निघण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याजवळच्या पेपरचे गठ्ठे आपल्या सायकलवर, गाडीवर इतके नेटकेपणाने बसवलेले असतात,

वृत्तपत्र विक्रेता दिन : नितदिन आम्हा ध्यास वृत्तपत्रांचा
राजू इनामदार ( उपमुख्य बातमीदार )
वृत्तपत्र विक्रेता दिन
आज १५ ऑक्टोबर, दिवंगत राष्ट्रपती ए. पी. जे. कलाम यांची जयंती. तरुणपणी ते वृत्तपत्र विक्रेत्याचे काम करत. त्यांच्या प्रेरणेतून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटना हा दिवस 'वृत्तपत्र वृत्तपत्र विक्रेता दिन' म्हणून साजरा करतात. 'लोकमत'ने नेहमीच वृत्तपत्र विक्रेत्यांबद्दल कृतज्ञता बाळगली. वृत्तपत्र दिनानिमित्त वृत्तपत्र विक्रेत्यांच्या जगाचा हा रिपोर्ताज.
मध्यरात्रीचे अडीच-तीन वाजले आहेत. रस्त्यावर अजिबात गर्दी नाही. दिव्यांचा पिवळसर उजेड रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरला आहे. सारे शहर झोपेच्या अधिन झाले आहे. गार वारा सुटला आहे. सगळे कसे सुनसान आहे. अगदी एवढासादेखील आवाज नाही. मधूनच एखादी चारचाकी गाडी भलामोठा आवाज करत जाते. ती गेली की पुन्हा तशीच शांतता. वितरण केंद्रावरचे वातावरण अशा वेळी 'त्या' चौकात मात्र हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होते. कोणीतरी सायकल, दुचाकीवर घाईघाईत येऊन अधिरतेने वाट पाहत उभा आहे. काहीजण रस्त्यावरची सगळी शांतता भेदणारा आवाज करत आपली गाडी त्याच चौकात लावतात. काहीजण लहानसा टेम्पो घेऊन येतात. तोही रस्त्याच्या कडेला लागतो. सगळ्यांच्याच चेहऱ्यावर अनिवार उत्सुकता आहे. कधी येणार गाडी, असे थंडीभरल्या हलक्या आवाजात ते एकमेकांशी बोलतातही.
पेपरची गाडी आल्यावर तेवढ्यात ती गाडी येते. लगेच सगळे मुख्य एजंटाकडे जातात. त्यांना हवा असणाऱ्या अंकाचे गड्ढे घेतात. मग तेवढ्यात दूसरी गाडी, त्याचवेळेच तिसरी, मग आणखी एक. अशाच एकामागोमाग एक गाडचा येत राहतात. चौकातल्या सगळी गर्दी आता रांगेत उभी असते. एक-एक जण एका-एका गाडीजवळ जातो. हवे असलेले अंक मिळवतो. त्याचवेळी रोजचा हिशेबही होतो. त्याप्रमाणे मुख्य एजंटाला पैसे दिले-घेतले जातात. ते एकदा झाले की, मग त्यांच्यातील प्रत्येक जण ते सगळे गड्ढे बरोबर सांभाळत आपल्या रोजच्या ठरलेल्या जागेवर लाईन काढयला बसतो.
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टाला 'लोकमत'चा सलाम
वृत्तपत्र विक्रेत्यांप्रती 'लोकमत'ने कायमच कृतज्ञता बाळगली. त्यातूनच 'लोकमत' एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजयबाबू दर्डा यांच्या मनात वृत्तपत्र विक्रेत्याचे शिल्प साकारण्याची कल्पना आली. कल्पनेला मूर्त स्वरूप देण्याच्या त्यांच्या स्वभावातून नागपूरमध्ये संविधान चौकात वृत्तपत्र विक्रेत्याचे हे भव्य शिल्प साकार झाले. देशभरातील असे हे पहिलेच शिल्प आहे. त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ६ जानेवारी २०१५ मध्ये या शिल्पाचे लोकार्पण झाले. राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील वृत्तपत्र विक्रेत्यांना त्यासाठी 'लोकमत'ने निमंत्रित केले होते. मूळचे बीडमधील व आता मुंबईत असलेले युवा शिल्पकार किरण अदाते यांनी ही शिल्पाकृती साकारली. त्यासाठी कॉपर व स्टीलचा वापर केला. सायकलवर बसून हात उंच करत ग्राहकाकडे वृत्तपत्र देण्याच्या तयारीतील वृत्तपत्र विक्रेत्याची शिल्पाकृती म्हणजे जगभरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कष्टाला 'लोकमत'ने केलेला 'सलाम'च आहे.
पत्रकांची भरणी
कोणीतरी तिथेच पत्रक घेऊन थांबलेले असते. ही पत्रके पेपरच्या मध्ये टाकायची असतात. २ हजार, १ हजार, कधीकधी प्रत्येक पेपरमध्ये ती पत्रके टाकायची असतात. रविवारी काही पेपरच्या पुरवण्या वेगळ्या छापून त्याचे गठ्ठे आलेले असतात. ते त्या-त्या पेपरमध्ये टाकायचे असतात. पटपट शब्दाचा अर्थ काय ते हे काम पाहिल्यावर समजावे. पत्रकांचा भला मोठा गठ्ठा हे विक्रेते पाहता-पाहता हातावेगळा करतात. त्यावेळी प्रत्येक पेपरमध्ये ते-ते पत्रक गेलेले असते. पहाटेचे साडेचार-पाच वाजलेले असतात. शहराला हळूहळू जाग येऊ लागलेली असते. पायी फिरणारे दिसू लागतात. काहीजण पळायला म्हणून निघालेले असतात.
प्रत्यक्ष लाइनवर पेपर टाकणे
अशा पहाटेच्या समयी ही सगळी फौज आपापले पेपर घेऊन निघते. निघण्यापूर्वी त्यांनी त्यांच्याजवळच्या पेपरचे गठ्ठे आपल्या सायकलवर, गाडीवर इतके नेटकेपणाने बसवलेले असतात, की गाडीचा उत्पादकही, गाडीवर इतके सामान बसले तरी कसे? या प्रश्नाने हैराण होईल. इतका बोजा सायकलवर किंवा गाडीवर घेऊन हे विक्रेते तिथून निघालेलेही असतात. कुठे जायचे, कोणाकडे जायचे, कितीवेळ थांबायचे हे सगळे ठरलेले असते. उगीचच चहा पीत थांब, मित्र भेटला म्हणून थांब असे ते कधीच करत नाहीत. त्यामुळेच तर वर्षानुवर्षे ठरलेल्या वेळी ठरलेला पेपर घरात येतोच येतो.
असा पडतो घरात पेपर
कोणाची लाइन एकदम पेठेतील असते. कोणाच्या ग्राहकांचा जुना वाडा किंवा मग एखाद्या बोळातून जाऊन मग लांब कुठेतरी चार-दोन घरे असतात. तर, कोणाची बंगलेवाल्यांची. काही जणांचे ग्राहक वरच्या मजल्यांवर असतात, तर काहींनी घराच्या कडीत पेपर अडकवून ठेवा म्हणून सांगितलेले असते. ५०, १००, कधीकधी ८०० व १ हजारही इतकी मोठी लाइन (ग्राहक) हे विक्रेते अगदी सहजपणे सांभाळतात. पाऊस, थंडी काहीही असू दे. याची लाइन कधी चुकत नाही. घरही चुकत नाही. दररोज नित्यनियमाने ठरलेल्या घरामध्ये ठरलेले वर्तमानपत्र सकाळी ७ वाजण्याच्या आधीच पोहोचलेले असते. विक्रेताही लाइन संपवून घरी परतलेला असतो. दुसरी कामे त्याची वाट पाहतच असतात.