‘एक राज्य एक नोंदणी’ आता पुणे जिल्ह्यातही; १ एप्रिलचा मुहूर्त, ठाण्याचाही समावेश

By नितीन चौधरी | Updated: March 19, 2025 13:59 IST2025-03-19T13:57:32+5:302025-03-19T13:59:02+5:30

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘एक राज्य एक नोंदणी’ असा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

pune news one State One Registration now in Pune district too; April 1st Muhurat Thane also included | ‘एक राज्य एक नोंदणी’ आता पुणे जिल्ह्यातही; १ एप्रिलचा मुहूर्त, ठाण्याचाही समावेश

‘एक राज्य एक नोंदणी’ आता पुणे जिल्ह्यातही; १ एप्रिलचा मुहूर्त, ठाण्याचाही समावेश

पुणे : राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा ‘एक राज्य एक नोंदणी’ हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर मुंबई शहर व उपनगर या दोन जिल्ह्यांत लागू करण्यात आला. त्यानंतर आता १ एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यांतही तो राबविण्यात येणार आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील एकूण ४८ दुय्यम निबंधक केंद्रांमध्ये जिल्ह्यातील कोणत्याही गावातील दस्त नोंदविता येणार आहे.

राज्यात सध्या एका जिल्हा सहनिबंधक कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या खरेदी-विक्रीच्या दस्तांची नोंदणी त्याच सहनिबंधक कार्यालयांमध्ये केली जाते. अनेकदा बाहेरील जिल्ह्यातील खरेदीदार दुसऱ्या जिल्ह्यात जमीन घर खरेदीचे व्यवहार करतात. अशांना संबंधित जिल्हा सहनिबंधक कार्यालयात जाऊन व्यवहार पूर्ण करावे लागतात. यातून मार्ग काढण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ‘एक राज्य एक नोंदणी’ असा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. प्रायोगिक तत्त्वावर १७ फेब्रुवारीपासून मुंबई व उपनगर या दोन जिल्ह्यांमधील ३२ उपनिबंधक कार्यालये एकत्रितरीत्या जोडण्यात आली असून, मुंबईतील खरेदीदार या कार्यालयांमध्ये कोठेही दस्त नोंदणी करू शकणार आहेत.

हाच उपक्रम राज्यात टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत असून, १ एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यांत राबविण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी दिली. आर्थिक वर्ष संपत आल्याने मार्चअखेरपर्यंत दस्तनोंदणींची संख्या जास्त असते. तसेच यंदा रेडिरेकनर दरांत वाढ होण्याचे संकेत असल्याने दस्तांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे राज्यातही लवकरच हा उपक्रम लवकर लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे शहरात २७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. तर जिल्ह्यात २१ कार्यालयांमधून दस्त नोंदणी केली जाते. या सर्व ४८ कार्यालयांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील खरेदीदाराने बारामती तालुक्यातील जमीन खरेदी केल्यास त्याला दस्त नोंदणीसाठी तेथील कार्यालयात न जाता पुण्यातील कोणत्याही कार्यलयात नोंदणी करता येणार आहे. तसेच इंदापूर तालुक्यातील एखाद्याने पुणे शहरात सदनिका खरेदी केल्यासही त्याला पुणे शहरात न येताही दस्त नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा सहनिबंधक प्रवीण देशपांडे यांनी दिली. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ तसेच पैसाही वाचणार आहे, अशी माहिती पुणे शहर सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.

दस्त नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या आय सरिता १.९ या प्रणालीच्या माध्यमातून एक राज्य एक नोंदणी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. येत्या १ एप्रिलपासून पुणे व ठाणे जिल्ह्यांत हा उपक्रम राबविला जाणार आहे.  - अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे 

Web Title: pune news one State One Registration now in Pune district too; April 1st Muhurat Thane also included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.