Shivshahi : शंभर शिवशाहीचे रूपांतर होणार हिरकणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 19:12 IST2025-07-25T19:11:59+5:302025-07-25T19:12:57+5:30
पुणे : वातानुकूलित शिवशाही बसच्या वाढत्या तक्रारींमुळे या बस बंद करून ‘हिरकणी’त रूपांतर करण्यात येत आहे. दापोडी येथील एसटी ...

Shivshahi : शंभर शिवशाहीचे रूपांतर होणार हिरकणीत
पुणे : वातानुकूलित शिवशाही बसच्या वाढत्या तक्रारींमुळे या बस बंद करून ‘हिरकणी’त रूपांतर करण्यात येत आहे. दापोडी येथील एसटी कार्यशाळेत शिवशाहीची पहिली हिरकणी बस तयार झाली आहे. पुढील काही महिन्यांत १०० शिवशाहीचे टप्प्याटप्प्याने हिरकणी बसमध्ये रूपांतर केले जाणार आहे.
शिवशाही बस एसटीच्या ताफ्यात आली, तेव्हा प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु कालांतराने शिवशाही बसच्या बिघाडामुळे या बसवर प्रचंड टीका झाली होती. शिवाय एसीमुळे या बसचे ब्रेकडाऊन वाढले होते. तसेच बसमधील बंद एसी यंत्रणा, अस्वच्छता यांबरोबरच इतर तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाने सर्व शिवशाही बस हिरकरणीत रूपांतरित करण्याचा निर्णय एक महिन्यापूर्वी घेतला होता. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळास तातडीने शिवशाही बसचे हिरकणीत रूपांतरित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एसटीच्या दापोडी येथील कार्यशाळेत प्रायोगिकतत्त्वावर पहिली बस तयार करण्याचे काम हाती घेतले होते. हे काम पूर्ण झाले असून, शिवशाहीचे रूपांतर हिरकणीत झालेली पहिली बस नुकतीच बाहेर पडली. ती पुणे विभागाकडे सुपूर्त केली आहे.
दापोडीतील वर्कशॉपमध्ये सर्व काम होणार :
दापोडी येथील एसटीच्या मुख्य कार्यशाळेत शिवशाहीची पहिली हिरकणी तयार झाली आहे. आता आणखी दोन बसचा प्रोटटाईप बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात १०० शिवशाही बसगाड्यांचे रूपांतर हिरकणीमध्ये केले जाणार आहे. यानंतर इतर कार्यशाळांमध्येही याच पद्धतीने काम होणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडे असणाऱ्या ७९० शिवशाही बस हिरकणीत रूपांतरित होणार आहेत, अशी माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.