पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना पकडल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक नवे प्रकरण समोर आले आहे. मंगळवारी सकाळी एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत अन्याय केल्याचा आरोप करत मुख्य प्रवेशद्वारासमोरील आतील बाजूस नोटा उधळल्या. तसेच या कर्मचाऱ्याने स्वत:च्या गळ्यातही नोटांचा हार घातल्याने एकच खळबळ उडाली.
मावळ तालुक्यातील खडकाळा ग्रामपंचायतीचा हा कर्मचारी असून, अनिल सिरसाट असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी राखीव असतात. या राखीव जागा सेवाज्येष्ठतेनुसार भरण्यात येतात. यानुसार या कर्मचाऱ्याचा सेवा ज्येष्ठता यादीत ३४ वा क्रमांक आहे. मात्र, या नोकर भरतीत सन २०२१-२२ या नोकर भरती वर्षात अन्याय झाल्याचा आरोप करत सिरसाट यांनी जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये नोटा उधळल्या. या घटनेमुळे जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली. नोटा उधळल्यानंतर काही काळ सिरसाट हे आंदोलनस्थळी ठाण मांडून बसले होते. दरम्यान, दुपारी पोलिसांनी त्यांना उधळलेल्या नोटांसह ताब्यात घेतले.
खडकाळा (ता. मावळ) ग्रामपंचायतीचे कर्मचारी अनिल सिरसाट यांनी सन २०२१-२२ या नोकर भरती वर्षात ग्रामपंचायत कर्मचारी कोट्यातून भरल्या जाणाऱ्या भरतीत त्यांच्यावर अन्याय झाल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलन केले आहे. शिवाय या मागणीसाठी त्यांनी मंत्रालयातही आंदोलन केले आहे. त्यांच्यावर मंत्रालयातील आंदोलनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. नियम डावलून नोकर भरती करता येत नाही. मात्र, अपात्र असूनही नियुक्ती मिळण्यासाठी दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. -विजयसिंह नलवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, जिल्हा परिषद