वृत्तपत्र विक्रेता दिन : अंधारात पेरतात ज्ञानाचा उजेड
By राजू इनामदार | Updated: October 15, 2025 15:08 IST2025-10-15T15:01:13+5:302025-10-15T15:08:35+5:30
रस्त्यावर सगळीकडे अंधार, मधूनच कर्कश आवाजात भुंकणारे श्वान, कधी पाऊस तर कधी असह्य थंडी... अशा प्रतिकूल स्थितीतही हातात वृत्तपत्रांचा गठ्ठा घेऊन न थकता घराघरांत

वृत्तपत्र विक्रेता दिन : अंधारात पेरतात ज्ञानाचा उजेड
- रस्त्यावर सगळीकडे अंधार, मधूनच कर्कश आवाजात भुंकणारे श्वान, कधी पाऊस तर कधी असह्य थंडी... अशा प्रतिकूल स्थितीतही हातात वृत्तपत्रांचा गठ्ठा घेऊन न थकता घराघरांत
आमची जिद्दच आम्हाला पुढे नेईल
पहाटे २ ते सकाळी ९ किंवा १०, पिंपरी-चिंचवडला, तर त्याहीपेक्षा उशीरा, म्हणजे ११ वाजेपर्यंत. कोणाची कामाची वेळ अशी असेल? आमची असते. सायकलवर, दुचाकीवर निम्मे शहर फिरतो आम्ही. तेही रात्रीच्या अंधारात. त्यातून फार काही मिळते असे नाही, पण आपण आपला व्यवसाय करतो याचा आनंद वेगळाच असतो. तो आम्ही पुरेपूर घेतो.
आम्ही म्हणजे वृत्तपत्र विक्रेते. पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ ही आमची संघटना १९८३ ला स्थापन झाली. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून आमचे २ हजारपेक्षा जास्त सदस्य आहेत. आम्ही सगळे स्वतः लाईन टाकतोच पण जास्त ग्राहक असतील, तर होतकरू मुलांना कामावर घेतो. अशी १० हजारपेक्षा जास्त मुले, लाईन बाँय म्हणून काम करतात. त्यांचाही विचार संघटना म्हणून काम करताना विजय पारगे अध्यक्ष, पुणे वृत्तपत्र विक्रेता संघ करतोच, कोरोना काळाने या व्यवसायाला धक्का दिलाच, पण त्यावर अवलंबून असलेल्या आमचीही बरीच परवड झाली, आता कुठे त्यातून आम्ही सावरतोय, मध्यंतरी आम्ही संघटनेच्या माध्यमातून १२०० इलेक्ट्रिक व्हेईकल घेतल्या. त्या मुलांना दिल्या, त्याही आधी दुसऱ्या अशाच स्कूटर टाईप ९५० गाड्या घेतल्या होत्या. त्याही मुलांना दिल्या. त्यांचे दररोजचे पेपर टाकणे सुलभ व्हावे हाच हेतू त्यामागे होता. पेपरचा व्यवसाय काय सकाळी ९ वाजता संपतो, असे बऱ्याच जणांना वाटते. पण तसे नाही. पेपर टाकणे संपले तरी अन्य कामे असतात. विशेषतः आर्थिक कामे. बिल देणे घेणे, उद्याचे पेपर घेण्याची व्यवस्था करणे, दिसायला सोपे दिसत असले तरी हे काम तेवढे सोपे नाही.
आमचे सगळे सदस्य जिद्दी आहेत हे सांगताना मला फार आनंद होते. विशेषतः महिला सदस्य. किमान ३०० ते ४०० मुले आज परदेशात आहेत. ती सगळी त्यांच्या घरच्या पेपर विक्री व्यवसायातूनच पुढे आली आहे. आयटी क्षेत्रातही सध्या २०० पेक्षा जास्त मुले काम करत आहेत. याच व्यवसायातून ती पुढे आली. सामाजिक मान सन्मान, प्रतिष्ठा असे सगळे काही याच व्यवसायाने त्यांना दिले. सरकारने वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळाची घोषणा केली. पुढे काहीच झाले नाही. ते व्हायला हवे. हा व्यवसाय आहे, मात्र माहिती, ज्ञान ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची सामाजिक जबाबदारीही आहे. फार पैसे त्यात मिळत नाहीत. त्यामुळे अशा मंडळाची फार आवश्यकता आहे. त्यातून आरोग्य, शिक्षण, अत्यावश्यक गरज पूर्ण करण्यासाठी कर्ज अशा गोष्टींमध्ये मदत करता येणे शक्य आहे. यासंदर्भात सरकारकडून काही होईल, अशी आमची अपेक्षा आहे.
----------
मीनाक्षी प्रभाकर कोऱ्हाळकर
अप्पा बळवंत चौकात गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून पेपरचा स्टॉल चालवतात. पती प्रभाकर यांच्या निधनानंतर समर्थपणे त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. पतीबरोबरच त्यांनी पेपरची लाईन टाकण्याचे काम शिकून घेतले होते. आता मुलगाही मदतीला असतो. या व्यवसायावरच त्यांनी मुलांचे शिक्षण तसेच लग्न अशा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडल्या. पहाटे ४ वाजता उठून बरोबर ५ वाजता त्या सेंटरवर सर्वांच्या आधी उपस्थित असतात.
------
रामनारायण श्रीराम दहाड
राम न्यूज पेपर एजन्सी या नावाने १७ नोव्हेंबर १९८९ मध्ये वीर मारुती चौक, शनिवार पेठेत वडिलांनी व्यवसाय सुरू केला तेव्हा मी नवव्या इयत्तेत शिक्षण घेत होतो. आता येत्या १७ नोव्हेंबरला व्यवसायाची ३६ वर्षे पूर्ण होतील. वडील शालेय शिक्षक होते. व्यवसाय करतानाच मी एम.कॉम. डीएमएम, जीडीसीए असे शिक्षण घेतले. त्याचा फायदा वाचनसंस्कृती जपण्यासाठी केला. ‘लोकमत’ पुण्यात प्रथम आल्यापासूनचा मी साक्षीदार आहे. १ रुपया स्वागत मूल्य असल्यापासून ते आज ७ रुपये लोकमत किमतीचा प्रवास पाहिलाय. ‘लोकमत’च्या डिस्प्ले स्कीमचे प्रथम पारितोषिक शिलाई मशीन मिळाले. त्यातून आईला शिलाई मशीन घेऊन देण्याचं स्वप्नं ‘लोकमत’ने पूर्ण करून दिलं. मोठी कन्या उच्चशिक्षण घेऊन नोकरी करत आहे. दोघी जणी शिक्षण करत आहेत.
-------- --
नीलिमा सतीश बधे
लोणी काळभोरचे माहेर असलेल्या नीलिमा बधे या लग्न करून वृत्तपत्र विक्रेते सतीश बधे यांच्या घरी आल्या तेव्हापासूनच त्यांनी पतीला व्यवसायामध्ये मदत करायची असे ठरवले होते. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून व्यवसाय कसा करता येतो व कसा वाढवता येतो? याचे त्या उत्तम उदाहरण आहेत. हडपसर गाडी चौकातील स्टॉलवर त्या सकाळी घरचे सगळे आवरून लवकर येतात व दिवसभर स्टॉलवर थांबतात. पेपरबरोबरच वेगवेगळे साप्ताहिक व मासिकही त्यांच्या स्टॉलवर असतात. पती व दोन मुले असा कुटुंब असलेल्या नीलिमा बधे यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. मुलांचे चांगले शिक्षण करून दिले. ते आज स्वतःच्या पायावरती उभे आहेत व चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत आहेत.
--------
सचिन महादेव मुंगारे
हे पानमळा सेंटरचे वृत्तपत्र विक्रेते आहेत. ३० वर्षे झाली वृत्तपत्र विक्री व्यवसायात आहेत. सुरुवातीला फक्त ५० पेपर होते, आज दररोज २५०० पेपर ते विकतात. पेपर लाईनवर टाकण्यासाठी त्यांनी १० मुले ठेवली आहेत. दररोज प्रत्येक मुलाला त्याच्या लाईनचे पेपर काढून देण्याचे काम ते लीलया करतात. त्यांची अर्जुन व वरूण ही दोन मुलेही त्यात आहेत.
----------
अरविंद ज्ञानेश्वर निंबाळकर कॅम्प सेंटरचे ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते.
३५ वर्षे या व्यवसायात आहेत. वडिलांनी सुरू करून दिलेला व्यवसाय त्यांनी कष्टाने वाढवला. भाऊ अजय व मुलगा अथर्व, मुलगी अक्षता हा वारसा आता पुढे चालवत आहेत. घरात शुभ कार्य असो अथवा दुःखद घटना असो, त्यांनी ग्राहकांना पेपर टाकणे कधीही बंद ठेवले नाही. लोकमतची कुटुंबाच्या प्रगतीमध्ये फार मोठी मदत झाली असे ते आवर्जून सांगतात. या व्यवसायातून आम्हाला खूप मोलाची मदत झाली आणि इथून पुढेही होईल अशी त्यांची भावना आहे.
-----
नीलेश अशोक खिस्ती
वडिलांबरोबर अगदी लहानपणी या व्यवसायात आले. त्यांनाही आता ३० वर्षे झाली. सुरुवातीला पेपर विकणारे म्हणून चेष्टा केली जात असे. मात्र, जिद्दीने व्यवसाय वाढवला. याच व्यवसायाने मान, सन्मान व आर्थिक स्थिरता दिली असे ते सांगतात. गेली ३० वर्षे हा व्यवसाय करीत आहे. वडील असल्यापासून आणि खूपच बिकट परिस्थितीत हा व्यवसाय अतिशय जिद्दीने व चिकाटीने वाढवला. वडिलांचे या व्यवसायातील स्थान इतके मोठे होते की आजही अनेक ग्राहक मला माझ्या नावाने नाही तर वडिलांच्या नावाने ओळखतात व त्याचा खूप अभिमान वाटतो, असे त्यांनी सांगितले.
-------
छाया शिंदे
चंदननगरच्या छाया शिंदे आधी साध्यासुध्या गृहिणी होत्या. अचानक पतीच्या निधनाने त्यांच्यावर मोठा आघात झाला. मात्र त्यानंतर खचून न जाता गेल्या १५ वर्षांपासून त्या एकहाती वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय यशस्वीपणे करत आहेत. नातेवाइकांचा विरोध, आर्थिक अडचणी आणि सामाजिक दबाव या सगळ्यावर त्यांनी मात केली. ग्राहकांचा विश्वास जपला. एक मोठे स्नेहवर्तुळच त्यांनी तयार केले. “ग्राहकांच्या प्रेमातून मिळणारे समाधान हेच माझे बळ आहे,” असे त्या भावनिकपणे सांगतात.
-------
सुरेखा पोकळे
दिव्यांग महिला म्हणजे फक्त समाजासाठीच नाही तर खुद्द तिच्या कुटुंबीयांनाही ओझे वाटते. पण, काही जिद्दी महिला अशा स्थितीतही आपला स्वाभिमान जपतात. सुरेखा पोकळे या स्वतः दिव्यांग, त्यात पतीला पॅरॅलिसिसचा आजार झाला. एखादी महिला नशिबाला दोष देत बसली असती; पण सुरेखा यांंनी कंबर कसली. आपण यावर मात करायचीच अशी जिद्द मनाशी बांधली आणि पूर्णही केली. गेल्या २० वर्षांपासून सिंहगड रोडवर त्या वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. पहाटे पावणेचारला उठून वृत्तपत्रांचे वितरण सुरू करतात. ‘या कामातूनच मुलांचे शिक्षण, संसार आणि माझा आत्मसन्मान उभा राहिला,’ असे त्या अगदी हसतमुखाने सांगतात.
-----
छाया अशोक शिंदे
चंदननगर सेंटरच्या विक्रेत्या. २५ वर्षांपासून या व्यवसायात आहेत. पती अशोक यांचे २००७ मध्ये निधन झाले. छाया यांना त्यांनी व्यवसायातील सर्व खाचाखोचा शिकवल्या होत्या. त्यामुळे न डगमगता त्यांनी व्यवसाय पुढे न्यायचे ठरवले व ते प्रत्यक्षातही आणले. पहाटे ५ वाजता त्या स्टॉलवर येतात. मुलांना लाईन काढून देतात, मोठा मुलगा अजिंक्य आता मदत करतो.
-----------
मुकुंद वायकर
क्वार्टरगेट सेंटर. सुरुवातीला रिक्षा चालवायचो, मात्र त्यात काही रस वाटत नव्हता. मग १९९५ ला वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला. १३० अंकांपासून सुरू झालेला व्यवसाय आता अगदी बहरात आहे. २२०० अंक मी दररोज विक्री करत होतो. कोरोनामुळे खूप मोठा फटका बसला. तरीही तग धरून राहिलो. या काळात परिसरातील वाचकांनी खूप प्रेम दिले. कष्टकरी माणूस म्हणून मला तो ओळखतात. ही ओळख मला माझा अभिमान वाटते.
----------
सुमन शिंदे
क्वार्टर गेटमध्ये असलेल्या वृत्तपत्र विक्री स्टॉलच्या संचालक शिंदेबाई म्हणजे वृत्तपत्र विक्री व्यवसायातील आदर्श उदाहरण आहे. त्यांचे वय आहे ८०. आजही त्या स्टॉलवर येतात. त्या निरक्षर आहेत, पण रंगांवरून अंक ओळखतात. ग्राहकाने अंक मागितला व त्यांनी चुकीचा दिला असे इतक्या वर्षात एकदाही झालेले नाही. त्यांना कोणीही फसवू शकत नाही इतका त्यांचा धाक आहे.
-------
सलीम बाबू सय्यद
विश्रांतवाडी सेंटरमध्ये यांचा स्टॉल आहे. ३३ वर्षांपासून या व्यवसायात आहेत. प्रत्येक ग्राहकाबरोबर उत्तम संपर्क हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. स्टॉल शिवाय ते पेपरची लाईनही टाकतात. त्यासाठी मुले ठेवली आहेत.
-----------
ढवळे न्यूज पेपर एजन्सी - स्वारगेट विभाग
काळूराम लक्ष्मण ढवळे यांनी ५० वर्षांपूर्वी सुरू केलेला हा व्यवसाय आता सागर, संदीप, संजय आणि संतोष ही चार भावंडे सांभाळतात. कोरोनाच्या काळातही त्यांनी जिद्दीने व्यवसाय टिकवून ठेवला. वाचकांमध्ये असलेले गैरसमज संपवण्यासाठी प्रयत्न केले.
----------
रामदास गिरमे
हडपसर विभागातील हे सर्वात ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते आहे. ५० वर्षांपूर्वी त्यांचे मोठे भाऊ मस्कू गिरमे यांनी हा व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांचे निधन झाले. रामदास यांनी व्यवसाय सुरूच ठेवला गाडीतळावरील जुन्या इमारतींमध्ये त्यांचा ग्राहक आहे. दररोज न चुकता त्यांच्या घरी वृत्तपत्र पोहचवण्याचे काम गिरमे निष्ठेने करतात. वयाच्या ६५ व्या वर्षी ते अजूनही स्वत: लाईन टाकतात. पत्नी छाया यांचीही त्यांना साथ आहे. धर्मेंद्र-हेमामालिनी अशा नावाने ते परिसरात परिचित आहेत.
--------
अरुण निवंगुणे
वयाच्या ११ व्या वर्षी या व्यवसायात आलो. आता ४५ वर्षे झाली. या व्यवसायाने फार काही दिले. आता दुसरी पिढी काम करत आहे. पौड फाटा भागात मला याच व्यवसायाने प्रतिष्ठा दिली, मान दिला. सध्या लाईन टाकण्यासाठी ५ मुले आहेत.
--------
अमित सुभाष जाधव
रामबाग कॉलनी, एलआयसी कॉलनी इथे स्टॉल आहे. कोरोना मुळे खूप मोठा फरक पडला. त्यात वाचकांची संख्या कमी झाली. मासिके, साप्ताहिके बंद पडली. मात्र तरीही आजसुद्धा वृत्तपत्रांना एक वेगळे महत्त्व आहे. स्टॉलवर गुगल रजिस्टर ठेवले आहे. त्याचा उपयोग होतो.