पुणे : पुण्यातील नाना नानी पार्कसमोर घडलेल्या धक्कादायक प्रकाराने शहरात खळबळ उडवली आहे. एका मद्यधुंद तरुणीने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या वेळेवर हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अधिकच्या माहितीनुसार, पावसाळ्यात मुठा नदीला मोठा पाण्याचा विसर्ग सुरू असताना, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणीने अचानक नदीपात्रात प्रवेश केला. मला माझी आई बोलवत आहे असे ओरडत तिने नदीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ती तरुण नेमकी कोण असा प्रश्न विचारला जात आहे.दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला स्वतःला मुंब्रा येथील रहिवासी आहे. ती पूर्णपणे नशेत होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेले. सुमारे पंधरा मिनिटांपर्यंत ही तरुणी नदीपात्रात गोंधळ घालत होती. पावसाळ्यात नदीच्या प्रवाहात वाढ झाल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, नशेतून केलेल्या या कृतीमुळे गंभीर परिणाम होऊ शकले असते, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.