Pune News: व्हिआयपी पास न मिळाल्याने महापौरांची मंत्र्यांच्या स्वागताला गैरहजेरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 19:13 IST2026-04-07T19:11:46+5:302026-04-07T19:13:00+5:30
- प्रभारी जनसंपर्क अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना

Pune News: व्हिआयपी पास न मिळाल्याने महापौरांची मंत्र्यांच्या स्वागताला गैरहजेरी
पुणे : पुणे विमानतळावर प्रवेश पास मिळाला नसल्याने महापौर मंजूषा नागपुरे यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे प्रभारी जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशा सूचना महापौरांनी महापालिका आयुक्तांना केल्याची चर्चा पालिकेत सुरू आहे.
शहरात येणाऱ्या मंत्री महोदयांचे स्वागत शहराचे प्रथम नागरिक म्हणून महापौर विमानतळावर करतात. त्यासाठी महापौरांचा तीन वर्षांसाठी विमानतळ प्रवेशाचा व्हीआयपी पास काढला जातो. यासाठी महापौरांचे फोटो, आधारकार्ड, निवडीचे पत्र आदी कागदपत्रे जमा करावी लागतात. चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर दोन महिन्यांपूर्वी महापालिकेचे नवीन सभागृह अस्तित्वात आले आहे. महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीही झाल्या आहेत. मात्र, महापौैर मंजूषा नागपुरे यांचा विमानतळाचा प्रवेश पास अद्यापही काढण्यात आलेला नाही.
दरम्यान, राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी महापौर कार्यालयाने विमानतळ प्रवेश पास काढण्याबाबत प्रभारी जनसंपर्क अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मात्र, अल्पावधीत पास काढणे शक्य झाले नसल्याने महापौर मंत्र्यांच्या स्वागताला जाऊ शकल्या नाहीत. यामुळे चिडलेल्या महापौरांनी संबंधित जनसंपर्क अधिकाऱ्यावर कारवाई प्रस्तावित करण्याच्या सूचना केल्याची चर्चा रंगली आहे.
चाैकट
राजशिष्टाचार अधिकाऱ्यांचे पद रिक्तच; कारवाई करणार कुणावर?
महापौरांचा व्हीआयपी पास काढण्याची जबाबदारी राजशिष्टाचार अधिकाऱ्यांची असते. महापौर कार्यालयाचे राजशिष्टाचार अधिकारी योगिता भोसले या नगरसचिव झाल्याने राजशिष्टाचार अधिकारी पद रिक्त आहे. या पदाची प्रभारी जबाबदारी कोणाकडेही दिलेली नाही. त्यामुळे पास काढण्याची जबाबदारी नेमकी कोणाची?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.