पुणे : लग्न म्हणजे दोन व्यक्तींनी एकत्र येऊन आयुष्याची नवीन सुरुवात करण्याचा क्षण; मात्र या जोडप्याच्या नशिबात हा क्षण अल्पकाळच टिकला. केवळ २८ दिवसच दोघे लग्नानंतर एकत्र राहिले. त्यानंतर मतभेद निर्माण झाल्याने दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अखेर जवळपास वर्षभराच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर या जोडप्याचा संसार कायमचा संपला आहे.
स्मिता आणि राकेश (नाव बदललेले) यांचे लग्न ७ जुलै २०२४ रोजी झाले. दोघेही उच्चशिक्षित असून, आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. लग्नानंतर काही दिवस सुखाने गेले; मात्र लगेच त्यांच्यातील मतभेद पुढे आले. वाद वाढत गेल्याने त्यांनी स्वतंत्रपणे राहण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये संवाद साधून तणाव कमी करण्याचे प्रयत्न दोन्ही कुटुंबीयांनी केले; परंतु त्यात यश आले नाही. शेवटी त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
यानंतर या जोडप्याने हिंदू विवाह अधिनियम, १९५५ च्या कलम १३(बी) अंतर्गत घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. हा अर्ज २० सप्टेंबर २०२५ ला येथील कौटुंबिक न्यायालयात दाखल करण्यात आला होता. कायद्यानुसार न्यायालयाने त्यांना सहा महिन्यांचा कुलिंग पिरियड’ देऊन पुन्हा विचार करण्याची संधी दिली; मात्र या कालावधीतही मतभेद मिटले नाहीत. परिणामी, ४ ऑक्टोबर २०२५ रोजी कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा परस्पर संमतीचा घटस्फोटाचा दावा मंजूर केला.
न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या दाव्यात, दोघांनी एकमेकांकडून कोणतीही आर्थिक देवाणघेवाण नसल्याचे नमूद केले आहे. म्हणजेच मालमत्ता, रक्कम किंवा इतर कोणत्याही आर्थिक स्वरूपातील देणी-घेणी न करता दोघांनी शांततेने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या दाव्यात पती-पत्नीच्या वतीने ॲड. मंगेश कदम आणि ॲड. सुमेध जोगदंडे यांनी काम पाहिले.