पुणे : गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यावरून मानाचे गणपती व अन्य मंडळांमध्ये मानापमान नाट्य सुरू असून, यात आता उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत मानाच्या मंडळांचा मान राखला गेला पाहिजे. यात मतभेद असायला नकोत, असेच स्पष्ट मत व्यक्त केले. मानाच्या मंडळांना विसर्जन मिरवणुकीसाठी सकाळी नऊ वाजता तयार करता येईल का? यासंदर्भात चर्चा करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना त्यांनी दिले आहेत.
विधानभवनात प्रशासकीय कामांचा आढावा घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “अनेक मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यासंदर्भात मला भेटले आहेत. मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीला उशीर करत असल्याने आम्हाला सात वाजता विसर्जन मिरवणूक सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, पुण्याच्या गणेशोत्सवाला मोठी सार्वजनिक परंपरा आहे. यात मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त सहभागी होत असतात. यंदा राज्य सरकारने याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे गणेश मंडळांमध्ये मतभेद राहणार नाहीत यासाठी प्रत्येकाचा मान ठेवूनच जेवढे शक्य होईल तेवढ्या लवकर ही मिरवणूक संपवावी. यासंदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना मंडळाशी, तसेच मनाच्या गणपती मंडळांशी चर्चा करण्यात सांगितले आहे.”
सहकार्य करा, मतभेद नकोत
यापूर्वी २००६-०७ मध्ये पालकमंत्री असताना गणेश मंडळे दुपारी बारा वाजता विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करत होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही वेळ सकाळी दहा वाजता करण्यात आली. आता मानाच्या मंडळांशी चर्चा केल्यानंतर ही वेळ नऊ वाजता करता येईल का, याची चाचपणी करण्यास पोलिस आयुक्तांना सांगितले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूक लवकर संपेल, यासंदर्भात प्रयत्न करण्यात येत आहेत. मानाच्या मंडळांनी किती ढोल पथके ठेवावीत, याबाबतही चर्चा झाली असून, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काही मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसंदर्भात स्वतःच एकतर्फी निर्णय घेऊन जाहीर केले आहे. मंडळांनी असे करू नये असे मत पवनार यांनी यावेळी व्यक्त केले. सर्वांनी सहकार्य करून पोलिस यंत्रणेवर ताण येणार नाही, याची काळजी घ्यावी. यासंदर्भात काही मंडळांशी चर्चा केल्यानंतर त्यांनीही सकारात्मक भूमिका घेत सहकार्य करण्याचे कबूल केले आहे.
विसर्जनाच्या दिवशी मेट्रोतर्फे पूर्णवेळ सेवा
गणेशोत्सवात मेट्रो रात्री बारा वाजेपर्यंत धावणार आहे. तर शेवटच्या दिवशी सबंध रात्रभर मेट्रोची सेवा सुरू राहील. मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी कोणत्या स्टेशनवर चढावे व कोणत्या स्टेशनवर उतरावे, याची माहिती मेट्रोतर्फे दिली जाणार आहे. याबाबत पोलिस आयुक्त पाहणी करून मेट्रोशी संवाद साधतील, असे पवार म्हणाले.
पाणी साचणाऱ्या ठिकाणांची कामे
गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला. गणेशोत्सवात अशा स्वरूपाची अडचण होणार नाही, यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी एक प्रस्ताव दिला आहे. पाणी साचणाऱ्या ठिकाणांची डागडुजी करण्यासंदर्भात त्यांना योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
उड्डाणपुलाची दुसरी बाजू लवकरच सुरू
सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाची दुसरी बाजू अजूनही खुली झाली नसल्याने नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. काम पूर्ण झाले असूनही त्याचे उद्घाटन होत नसल्याबाबत पवार यांना प्रश्न विचारल्यावर दुसरी बाजू लवकर सुरू करण्यात येईल, अशा सूचना संबंधितांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवापूर्वी बॅरिकेड्स काढून रस्ते मोकळे करावेत. राडारोडा काढून खड्डे बुजवावेत, असेही त्यांनी सांगितले.