Video : एकुलत्या एक लेकाला बिबट्याने डोळ्यादेखत उचलून नेलं; आईचा आक्रोश पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावले
By किरण शिंदे | Updated: December 16, 2025 18:17 IST2025-12-16T18:17:18+5:302025-12-16T18:17:55+5:30
मुलावर हल्ला होत असल्याचं पाहताच ही माऊली जीवाच्या आकांताने धावली. तिने बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. मात्र तोपर्यंत बिबट्या रोहितला घेऊन उसात पसार झाला होता.

Video : एकुलत्या एक लेकाला बिबट्याने डोळ्यादेखत उचलून नेलं; आईचा आक्रोश पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावले
पुणे -पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि शिरूर तालुक्याच्या पारगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या गावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय. आईच्या डोळ्यासमोरच बिबट्याने मुलावर झडप घातली. रोहित कापरे असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. रोहितचे आई-वडील शेतमजूर असून ते कांदा लागवडीचं काम करत होते. याचवेळी रोहित शेतालगत खेळत असताना, ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घातली आणि उसाच्या दिशेने फरफटत नेलं. हा संपूर्ण थरार रोहितच्या आईच्या डोळ्यासमोर घडला. मुलावर हल्ला होत असल्याचं पाहताच ही माऊली जीवाच्या आकांताने धावली. तिने बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. मात्र तोपर्यंत बिबट्या रोहितला घेऊन उसात पसार झाला होता.
दरम्यान, बिबट्याने मुलावर हल्ला केल्याचं कळतच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ज्या दिशेने बिबट्या या मुलाला घेऊन गेला त्या दिशेने शोधा शोध सुरू केली. आणि काही वेळानंतर उसाच्या शेतात जखमी अवस्थेत रोहित आढळून आला. त्याला तातडीने नजिकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या घटनेनंतर पुन्हा एकदा ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. या परिसरातील बिबट्याचा सरकारने लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणीही केली जात आहे.
दरम्यान या घटनेमुळे काफरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील बिबट्याच्या हल्ल्यांमधील ही चौथी मृत्यूची घटना आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून अजून किती निष्पाप बळी जाणार?” असा सवाल संतप्त ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.