कुरुळी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) पुणे जिल्ह्यातील नाशिक फाटा ते खेड (किमी १२.१९० ते किमी ४२.११३) या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील रस्ता विकासासाठी मोठी निविदा जाहीर केली आहे. या प्रकल्पांतर्गत विद्यमान रस्त्याचे ४ ते ६ मार्गांमध्ये रूपांतर होणार असून, दोन्ही बाजूंना २-मार्गी सेवा रस्ते उभारले जाणार आहेत. याशिवाय, एकाच खांबावर आधारित पहिल्या स्तरावरील (स्तर-१) ८-मार्गी उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन आहे.
या प्रकल्पासाठी पीएमआरडीए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि खेड येथील उपविभागीय अधिकारी तथा प्राधिकृत भूसंपादन अधिकारी अनिल दौडे यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. खेड तालुक्यातील चिंबळी, कुरुळी, आळंदी फाटा, चाकण, वाकी, संतोषनगर, शिरोली आणि राजगुरुनगर परिसरातील शेतकऱ्यांना रस्ता विस्तारीकरणासाठी नोटिसा देण्यात आल्या असून, भूसंपादनाचे काम सुरू आहे.
या प्रकल्पाला यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. यासंदर्भात ९ जुलै २०२५ रोजी पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महसूल सभेत चर्चा झाली. त्यानंतर १८ जुलै २०२५ रोजी चाकण येथील मीरा मंगल कार्यालयात बाधित शेतकरी, पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), एनएचएआयचे उपअधीक्षक, भूमी अभिलेख खेड आणि पिंपरी-चिंचवडचे सहायक पोलिस आयुक्त यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. हा प्रकल्प बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा (बीओटी) पद्धतीने राबवला जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, तसेच प्रवाशांना वेगवान आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल.