पुणे : लाडकी बहीण योजना हा निवडणुकपूर्व आर्थिक आमिष घोटाळाच होता. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांमध्ये तब्बल २६ लाख ३४ हजार महिला अपात्र लाभार्थी असल्याचे खुद्द महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीच मान्य केल्यामुळे तो आर्थिक आमिष घोटाळाच होता हा असे सिद्ध झाले असल्याची टीका आम आदमी पार्टीने (आप) केली.
पक्षाचे प्रदेश प्रवक्ते मुकुंद कीर्दत म्हणाले, “६० वर्षे वयाखालील सर्वच महिलांना सरसकट दरमहा १५०० रुपये देणे, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच्या चार महिन्यांचे पैसे आगाऊ जमा करणे हा सर्व या घोटाळ्याचाच भाग आहे. सरसकट पैसे देणे ही चूकच झाली असे आता सांगितले जात आहे, मग त्यावेळी सरकार झोपले होते का, आता अपात्र महिला योजनेत असल्याचे सांगून त्यावेळच्या अर्जांची छाननी केली जात आहे, काही लाख महिलांना योजनेतून बाद केले जात आहे; मात्र त्यांच्या खात्यावर जमा केलेल्या पैशांचे काय, ते वसूल कसे करणार हे सरकारने जनतेला सांगावे.”
योजनेत १४ हजार ३०० पुरुष लाभार्थी आढळले हा तर फसवणुकीचा कळसच आहे, असे मत व्यक्त करून कीर्दत यांनी असे अर्ज मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली. जनतेने कररूपाने सरकारकडे जमा केलेले कोट्यवधी रुपये असे एखाद्या योजनेद्वारे उधळण्याचा सरकारला कसलाही अधिकार नाही. हा सर्व पैसे जनतेचा आहे. त्यामुळे गैरवाटपाची एकूण रक्कम किती, ती वसूल कशी केली जाणार, संबंधित अर्ज मंजूर करणाऱ्या सरकारी यंत्रणेवर काय कारवाई करणार, योजना ज्या खात्याची आहे असे सांगितले जाते, त्या महिला व बालविकास विभागाला यामध्ये जबाबदार धरले जाणार आहे किंवा नाही, या प्रश्नांची उत्तरे सरकारने राज्यातील जनतेला द्यावीत, अशी मागणीही कीर्दत यांनी केली.