पुणे: राज्यात दोन समाजांच्या दोन वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्याची आवश्यकता होती का? असा प्रश्न करत ज्येष्ठ नेते आरक्षणाच्या मागण्यांवर राज्यकर्त्यांकडून घेतल्या जात असलेल्या भूमिकांवर नाराजी व्यक्त केली. राजकारण न करता सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न करणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले.मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आलेल्या पवार यांनी माध्यम प्रतिनिधींबरोबर संवाद साधला. त्यावेळी राज्यातील सामाजिक वातावरण बिघडले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, बंजारा समाजाने त्यांचा आदिवासी वर्गात समावेश व्हावा म्हणून मोर्चा काढला. दुसऱ्याच दिवशी आदिवासी समाजाचा मोर्चा झाला. दोन समाजांमध्ये कारण नसताना वातावरण वेगळे व्हायला लागले. आता सरकारने दोन समित्या नेमल्या. एक एका जातीची एक दुसऱ्या जातीची. यात एकजण दुसऱ्याचा विचार करणार नाही. असे करण्याची, दोन वेगवेगळ्या समित्या नेमण्याची गरज होती का? सामाजिक वीण दुबळी होत आहे.
राजकारण न करता सामाजिक ऐक्य साधण्याचा प्रयत्न होणे महत्वाचे आहे. हैद्राबाद गॅझेटविषयी कधीच वाचले नव्हते. तो भाग महाराष्ट्रात नव्हता. त्याच्या खोलात आम्ही कधी गेलो नाही. प्रत्येक जातीची वेगळी मागणी असेल तर ऐक्य कसे होईल? असा प्रश्न पवार यांनी केला.