लोणी काळभोर : रस्त्याच्या कामात अडथळा का आणता विचारणा करणाऱ्या व्यक्तीला माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी दगडाने व काठीने मारहाण करून शिवीगाळ व हातपाय तोडण्याची धमकी दिल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सुनिल गौतम वाघमारे (वय ३२, रा. तारमाळा, थेऊर, हवेली) असे गुन्हा दाखल केलेल्या फिर्यादीचे नाव आहे. ३ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता पी.एम.आर.डी.ए.च्या अंतर्गत चालू असलेल्या ड्रेनेज व लाईट पोलच्या कामादरम्यान ही घटना घडली.रस्त्याचे काम दीपक दिगंबर नाईक यांच्या व इतरांच्या शेताजवळ काम चालू असताना माजी आमदार संभाजी कुंजीर हे घटनास्थळी आले आणि मोठमोठ्याने ओरडून, सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ करत दगड उचलून कामगारांच्या दिशेने फेकले. या प्रकारामुळे कामगार धास्तावले व पळून गेले.वाघमारे यांनी संभाजी कुंजीर यांना दगडफेक करू नका अशी विनंती केली असता, त्यांनी वाघमारे यांना धमकी दिली की, ”पुन्हा येथे आलास तर तुझे हातपाय तोडून टाकीन” असे म्हणत लाकडी काठीने हातावर व पायावर मारहाण केली. त्यामुळे माजी आमदारांनी अरेरावी करून सार्वजनिक गावच्या विकास कामात अडथळा आणल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे. यापूर्वीही माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी थेऊर मध्ये इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे केल्याप्रकरणी त्यांच्यावर लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले होते.