पुणे : सिंहगड रस्ता उड्डाणपूलाची धायरीकडून राजाराम पुलाकडे येणारी बाजू सुरू करावी म्हणून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या वतीने बुधवारी सकाळी तिथे होमहवन करून व पूजा घालून आंदोलन करण्यात आले. दादा, ताई, भाऊंना वेळ नसल्याने उदघाटन लांबणीवर टाकून जनतेचे हाल केले जात आहेत अशी टीका करण्यात आली.
शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे तसेच असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. रस्त्यावरून जाणारे वाहनधारक राज्यकर्त्यांच्या त्रासामुळे आधीच वैतागले आहेत, त्यामुळे आंदोलन करून आम्ही रस्ता अडवणार नाही असे आधीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे पुलाच्या मध्यभागी खास जागा वगैरे तयार करून तिथे पूजा घालण्यात आली. होम पेटवण्यात आला. त्यासाठी खास भटजीला बोलावण्यात आले होते. त्यांनीही मंत्र वगैरे म्हणत होम पेटवला व राज्यकर्त्यांना जनहिताची बुद्धी दे अशी मागणी करण्यात आली. राज्यकर्त्यांच्या निषेध करणारे फलक हातात धरून यावेळी घोषणा देण्यात आल्या.
संजय मोरे यांनी सांगितले की महापालिकेच्या माध्यमातून हा पूल बांधला जात आहे. त्याची मुदत वारंवार वाढवून घेतले. तीन वर्षे होऊन गेली या रस्त्यावरून दररोज जा-ये करणारे लाखो वाहनधारक दररोज वाहतूक कोंडीचा सामना करत आहेत. ठेकेदार कंपनी व महापालिकेचे अधिकारी यांचे संगमनमत झाले आहे. त्यांना राज्यकर्तेही सामील आहेत. या रस्त्याच्या संपूर्ण भागात भारतीय जनता पक्षाचे किमान १५ ते १६ माजी नगरसेवक आहेत. याच भागाच्या आमदार असलेल्या माधुरी मिसाळ आता राज्यमंत्री आहेत. सत्तेत सहभागी असलेला दुसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचेही पदाधिकारी नगरसेवक या रस्त्यावर राहतात. त्यांच्यापैकी कोणालाच ठेकेदार कंपनीला युद्धपातळीवर काम करायला सांगून पूल त्वरीत सुरू करावा असे वाटत नाही.
एकच बाजू सुरू करण्यात आली. दुसरी बाजू लगेचच सुरू होईल असे त्याचवेळी सांगण्यात आले होते. त्या उदघाटनाच्या वेळी भलेमोठे फ्लेक्स लावून श्रेय घेणारे आता कुठे गेले असा प्रश्न नागरिक करत आहेत. तीन महिने झाले तरीही अजून काम सुरू आहे असेच सांगण्यात येते. खरे कारण त्यांना त्यांच्या नेत्यांची उदघाटनाची वेळ मिळत नाही हेच आहे असे संजय मोरे म्हणाले. आंदोलनाच्या ठिकाणी राज्यकर्त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मागील ३ वर्षे विनातक्रार त्रास सहन करणाऱ्या नागरिकांच्या हस्ते उदघाटन कून पुलाची दुसरी बाजू तातडीने सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.