- राहुल गणगे
पुणे: चोहोबाजूंनी काटेरी झुडपे, दोन खोल्या असलेल्या शाळेची झालेली दुरवस्था अन् त्यामध्ये येणारे तीन विद्यार्थी, शाळा बंद करण्याची ग्रामस्थांची तयार झालेली मानसिकता या सर्वांवर मात करत दोन-तीन वर्षांमध्ये लोकसहभागातून जागतिक पातळीवर पोहोचलेली शाळा म्हणजे खेड तालुक्यातील कनेरसर परिसरातील जालिंदरनगरची शाळा. २० वर्षानंतर असलेल्या स्पर्धेतील जगामध्ये असलेलं शिक्षण या शाळेमध्ये दिलं जातं. विशेष म्हणजे मित्र-मैत्रीणींच इथं शिक्षक बनलेले असतात. हे सर्व घडलं ते केवळ दत्तात्रय वारे गुरुंजींमुळं.
शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी शाळेतील दत्तात्रय वारे गुरुजींची फेब्रुवारी २०२२ मध्ये काही कारणांमुळे खेडच्या कनेरसर येथील जालिंदनगरच्या शाळेवर बदली झाली. गुरुजींच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी चोहोबाजूंनी काटेरी झुडपे, दोन खोल्या असलेल्या शाळेची झालेली दुरवस्था अन् त्यामध्ये येणारे तीन विद्यार्थी असे चित्र होते. त्यातच ग्रामस्थांची शाळा बंद करण्याचीच मानसिकता यामुळे काय कराचा असा मोठ प्रश्न वारे गुरुंजी पुढे होता. सुरुवातीला ग्रामस्थांच्या मानसिकतेत बदल करण्याचा निश्चय केला. तत्पूर्वी शाळा चांगली होईल. पण त्यासाठी लोकसहभागाची गरज असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. त्याला लगेचच सहमतीही मिळाली आणि खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. शाळेचा परिसर, वर्ग खोल्यांच रुपड बदलल.
शाळेची इमारत मुलांना आवडेल अशीच आहे. शाळेला सिमेंटच्या भिंती नाहीत. तर, सरकवून उघडता येतील अशी काचेची दारे बनवली आहेत. शाळेत बसल्यावर बाहेरचे मोकळे आकाश दिसले पाहिजे, ही मुलांची इच्छा विचारात घेऊनच शाळेची इमारत तयार करण्यात आली आहे. शिवाय, बाके न बसवता, शाळेच्या आत काही ठिकाणी पायऱ्या तयार केल्या आहेत. सकाळी नऊ वाजता शाळा भरली की, सर्व मुले-मुली मिळून शाळेची स्वच्छता करतात. हातात झाडू घेऊन अंगण झाडणं, काचेची दारे पुसणे, हायड्रोपोनिक पद्धतीनं लावलेल्या झाडांची काळजी आणि शिक्षकांच्या देखरेखीखाली शाळेतील संडास-बाथरूम साफ करणे अशी सर्व कामे मुले मिळून करतात. शाळेची जबाबदारी मुलांचीच असावी यासाठी त्यांचं एक मंत्रिमंडळही स्थापन करण्यात केले आहे. शाळेबद्दलचे निर्णय घेण्याची, काही ठराव पास करण्याचे काम या मंत्रिमंडळाचे आहे. त्यांच्या सूचना शिक्षकांनाही लागू असतात.
शाळेत मुलांना एक तास जेवायची सुटी असते. त्यातल्या अर्ध्या तासात मुलं जेवतात आणि उरलेला अर्धा तास योगनिद्रा करतात. मुलांना योगनिद्रेसाठी स्पीकरद्वारे सूचना दिल्या जातात. त्याचवेळी हळूवार संगीतही सुरू असतं. काही मुले अर्धवट झोपेच्या स्थितीत जातात. तर काही मुलांना खरंच झोपही लागते. ३० मिनिटे घालवल्यानंतर मुले उठतात तेव्हा ती अतिशय तरतरीत झालेली असतात. त्यांच्या मेंदूवरचा थकवा निघून गेलेला असतो आणि सकाळी झोपेतून उठल्यानंतर मेंदूची शिकण्याची जितकी तयारी असते ती परत येते. अर्धा तास संपला तरी मुलं जाग आल्यावर उठतात आणि अवांतर वाचनाच्या तासासाठी आवडीचं गोष्टीचं पुस्तक घेऊन वाचत बसतात. शाळेत वेगवेगळ्या इयत्तेसाठी वेगवेगळे वर्ग, मुलांना बसण्यासाठी बाक असं काहीही नसल्यानं मुलांना जमिनीवर आरामशीर आडवं होऊन किंवा झाडाखाली पडूनही वाचता येत असल्याचे वारे गुरुजींनी सांगितलं आहे.
मित्र मैत्रिणीच बनले शिक्षक -जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेतील मित्रच मुलांचे शिक्षक होतात. शिक्षक शिकवतात आणि मुले लिहून घेतात, असे चित्र या शाळेत नाही. मोठ्या वर्गातल्या काही मुलांना विषयमित्र म्हणून नेमले जातात. त्या विषयमित्रासोबत चार-पाच मुलांचा एक गट जोडून दिला जातो. हा विषयमित्रच त्यांना शिकवतो. मुलांना एकमेकांकडून शिकण्याचा पुरेपूर फायदा होतो. ठरवून दिलेल्या अभ्यासक्रमाच्या पलीकडेही मुलं शाळेत खूप काही शिकतात. मुलं एकमेकांकडून जपानी भाषा शिकतात. त्यासाठी इंटरनेटची आणि वेगवेगळ्या ॲप्सचीही मदत घेतात. काहींनी जपानी सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या 'जॅपनिज लँग्वेज प्रोफेशिअन्सी टेस्ट' या भाषा परीक्षेत एन ५ पर्यंतची मजल गाठली आहे. यंदा एकूण ४५ मुले एन ५ परीक्षेची तयारी करत आहेत.
कौशल्यावर आधारित शिक्षणातून मुलांची प्रगती -
जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेत कौशल्यावर भर दिला जातो. शाळेत २२ प्रकारची कौशल्य शिकण्याची सोय आहे. त्यात चित्रकला, हस्तकला, ज्वेलरी बनवणं, प्लंबिंग, सुतारकाम, मेकअप आर्ट आणि अगदी कोडिंग आणि थ्रीडी ॲनिमेशनही शिकवले जाते. मुले त्यांना आवडेल ते शिकतात. या कौशल्याचा वापर करूनच शाळेत शिकणाऱ्या शिवम खरपुडेनं वयाच्या आठव्या वर्षी टाकाऊ वस्तूंचा वापर करून रोबोट बनवला आहे. पहिल्यांदा रोबोट कुठेही जाऊन धडकू लागला तेव्हा त्यानं विचार करून त्यात सेन्सर्सही बसवले. शिवाय, आतमध्ये ॲलेक्सा बसविल्याने शिवमचा रोबोट विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंही देतो.
जगाचं शहाणपण येतयं: वारे
शाळेची पटसंख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. २०२२ मध्ये शाळेची पटसंख्या ३ होती. मात्र, २०२५-२६ या वर्षात शाळेत जवळपास १२० विद्यार्थी असून काही विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतिक्षीत आहेत. इथं आल्यापासून मुलांत खूप बदल झाले असल्याचं त्यांना जाणवतं. "अभ्यासक्रमापलीकडचं बरंच काही त्यांना कळायला लागलंय. जगाचं शहाणपण येत आहे," असं दत्तात्रय वारे गुरुजी म्हणाले. पालकांच्या मदतीनंच शाळा एवढी उभी राहिली आहे. शाळेला माती आणण्यापासून, नर्सरीत रोपं आणण्यापर्यंत सगळी कामं पालकांनी मिळून केली आहेत. लोकसहभागातूनच शाळेसाठी नवा स्वीमिंग पूल बांधण्याचं काम सुरू आहे. यासर्वांमध्ये माझे सहकारी मुख्याध्यापक संदीप म्हसुडगे यांचा विशेष उल्लेख करावा लागले. त्यांच्या सहकार्यामुळेच हे सर्व शक्य झाल्याचे वारे म्हणाले.
कनेरसर ता. खेड येथील जालिंदरनगर जि.प.शाळेमध्ये दोन वर्षात आमुलाग्र बदल करून आदर्श व उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांनी जागतिक पातळीवर मिळवून दिलेला नावलौकिक अभिमानास्पद आहे. - सुनीता केदारी, सरपंच कनेरसर
मराठी शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होत असताना दत्तात्रय वारे गुरूजींनी अथक परिश्रम व कौशल्याने कनेरसर येथील जालिदरनगर जि.प.शाळेची जागतिक स्तरापर्यंत केलेली प्रगती उल्लेखनीय आहे. - सूर्यकांत घोलप, निवृत्त मुख्याध्यापक, अंबिका विद्यालय कनेरसर
जालिदरनगर शाळेचा वर्ल्ड टॉप टेन स्कुलमध्ये समावेश झाला आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण दिले जाते हे यातून सिद्ध होते. शासनाने प्रत्येक तालुक्यात अशा शाळा निर्मितीसाठी दत्तात्रय वारे यांना जबाबदारी द्यावी - अशोकराव टाव्हरे, कवी-लेखक, सामाजिक कार्यकर्ते, कनेरसर