Video : विमा धोरण चुकीचे; संकटातील शेतकऱ्यांना सरकारनं उभं करावं - शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:15 IST2025-11-04T16:11:43+5:302025-11-04T16:15:27+5:30
शेतकऱ्यांना पाच रुपये, तीन रुपये, दोन रुपये इतकी मदत मिळाली आहे. विमा धोरण चुकीचे आहे, अशी नाराजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.

Video : विमा धोरण चुकीचे; संकटातील शेतकऱ्यांना सरकारनं उभं करावं - शरद पवार
बारामती : यावर्षी शेतकऱ्यांच्या पुढे मोठं संकट उभं आहे. त्यांच्या परिस्थितीला सरकारने जाणून घेतले पाहिजे. केंद्र सरकारने याबाबत काही पॅकेज जाहीर केले, जे फक्त एक भाग आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांनी विमा देखील घेतला होता. नुकसान झाल्यानंतर विम्याची रक्कम तातडीने मिळाली पाहिजे.
मात्र, याबाबत माझ्याकडे काही तक्रारी आल्या आहेत. शेतकऱ्यांना पाच रुपये, तीन रुपये, दोन रुपये इतकी मदत मिळाली आहे. विमा धोरण चुकीचे आहे, अशी नाराजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केली.
शरद पवार मंगळवारी (दि.४) बारामती दौऱ्यावर होते. गोविंद बाग येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना, त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. पवार म्हणाले, संकटातील शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर आर्थिक मदत करावी. राज्यामध्ये सामाजिक ऐक्य टिकवून ठेवण्यासाठी सगळ्यांनी खबरदारी घ्यावी. विशेषतः सरकारमध्ये जे आहेत त्यांचं कर्तव्य अधिक आहे.
शरद पवार यांनी राज्य मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याच्या जातीयवाद वाढेल अशा प्रकारच्या वक्तव्यावर टीका केली आणि ते राज्याच्या हिताविरुद्ध असल्याचे सांगितले. मात्र, पवार यांनी कोणाला टोला लगावला याबाबत नेमकी माहिती दिली नाही, ज्यामुळे यावर चर्चा सुरू आहे. दरम्यान, राज्य निवडणूक आयोगाच्या मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार यांनी, मला याबाबत काही माहिती नाही, असे उत्तर दिले.