लोणी काळभोर : कदमवाक वस्ती परिसरात रिक्षामधून प्रवास करणाऱ्या तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील रोख रक्कम व मोबाइल लंपास करणाऱ्या चौघांना लोणी काळभोर पोलिसांनी अवघ्या ३ तासांत अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल ३ लाख ४२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पीडित नामदेव विकास पवार (वय २३, रा. कदमवाक वस्ती) हे रविवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरून रिक्षाने घरी जात असताना श्री दत्त मिसळ हॉटेलसमोरील परिसरात रिक्षाचालक व त्यातील तिघांनी मिळून त्यांना रिक्षातून खाली फेकले. मारहाण करून खिशातील मोबाइल फोन व रोख ३ हजार ५०० रुपये असा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.
गुन्हा घडल्यानंतर केवळ तीन तासांतच पोलिस निरीक्षक बाजीराव वीर, शैलेश कुदळे, पाटील, चक्रधर शिरगिरे यांच्या पथकाने खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना ताब्यात घेतले. याप्रकरणी अदिल लतीफ शेख (वय २४), हबीब सिराज शेख (वय २१), बबलू मुन्नालाल अग्रवाल (वय १९), विधिसंघर्षित रोहन युनूस शेख (वय १७, सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा, मोबाइल फोन्स, रोख रक्कम असा एकूण ३ तीन ४२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे व सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक स्मिता पाटील, तसेच सहा. पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर, पो. उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के व पोलिस कर्मचारी सातपुते, वणवे, माने, जगदाळे, देवीकर, कुंभार, गाडे, कर्डिले, सोनवणे, शिरगिरे, दडस, पाटील, शैलेश कुदळे, बाजीराव वीर यांनी केली आहे.