पुणे : पुणे जिल्हयात मांजरी, फुरसुंगी, उरूळी देवाची, चाकण आणि हिंजवडी परिसरासाठी महापालिका याप्रमाणे तीन महापालिका कराव्या लागतील, असे राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी पुण्यात सांगितले. त्यानंतर पुण्यात तीन नाही, तर एकच नवीन महापालिका करण्याची चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे नवीन महापालिका तीन की, एक करणार यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यामध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे.उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांनी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक आणि परिसराची पाहणी केली. त्यावेळी तुम्हाला आवडो किंवा न आवडो पण नजीकच्या काळात चाकण आणि या सर्व परिसरात, मांजरी, फुरसुंगी, उरूळी देवाची आणि हिंजवडी परिसरासाठी महापालिका करावी लागणार आहे. पुणे जिल्ह्यात नव्याने तीन महापालिका कराव्या लागणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली. ही घोषणा करून काही तास उलटत नाही, तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत विधान केले. पत्रकाराशी बाेलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे आणि पिंपरी- चिंचवड या दोन महानगरपालिका असून अजून एक नवी महापालिका करण्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. आता तरी पीएमआरडीए केल्याने सध्या त्याची निकड आहे का ? याचा विचार करावा लागेल. पण भविष्यात ज्या प्रकारे पुणे जिल्ह्यात शहरीकरण सुरू आहे ते पाहता भविष्याच कधीतरी विचार करावा लागेल असे त्यांनी सांगितले.जनतेने तीन की एक आकडा खरा मानायचा?
पुणे जिल्ह्यात तीन महापालिका निर्माण करण्याची घोषणा सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार करतात. संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही संख्या तीन नाही तर एक असल्याचे सांगतात. जनतेने कोणता आकडा खरा मानायचा? सरकारने नक्की काय ठरवले आहे? याबाबत स्पष्टीकरण करण्याची गरज आहे. महायुती सरकारच्या पक्षांमध्ये धोरणात्मक निर्णयात गोंधळ निर्माण झाला आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रवक्ता सुनिल माने यांनी सांगितले.