इंदापूर : लाडकी बहीण यांसारख्या योजनांमुळे इतर याेजनांना निधी मिळण्यास सध्या विलंब होत आहे. मात्र, येत्या तीन-चार महिन्यांमध्ये ही परिस्थिती रुळावर येईल, असे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी घरकुल योजनेच्या अनुदान वितरण कार्यक्रमात सांगितले. दरम्यान, भरणे यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून, त्यांनी अप्रत्यक्षणे सरकारवरच निशाणा साधल्याचे बोलले जात आहे.दत्तात्रय भरणे म्हणाले, इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या मंजूर कामांची दररोज केवळ उद्घाटने करायची ठरवली तर तीन वर्षांचा कालावधीदेखील अपुरा पडेल इतके काम झालेले आहे. मात्र, यापेक्षाही जास्त काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सीआरएस फंडामधून महाराष्ट्राला मिळालेल्या एक हजार ९०० कोटी रुपयांमधून इंदापूर तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी ७४ कोटी रुपये मंजूर करून आणले आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे अत्याधुनिक शाळांमध्ये रूपांतर व्हावे, ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे.
गटशिक्षण अधिकारी सचिन खुडे म्हणाले की, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक हजार ८८३ पात्र, परंतु भूमिहीन असणाऱ्या लाभार्थ्यांना शेती महामंडळाकडील जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. समाधान भोरकडे यांनी सूत्रसंचालन केले. संजीवकुमार मारकड यांनी आभार मानले. हनुमंत कोकाटे, दीपक जाधव, सचिन सपकळ, अतुल झगडे, ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
विरोधकांना कानपिचक्या
इतरांना निधी नाही, मग इंदापूरलाच कसा मिळतो अशी विचारणा आजूबाजूच्या जिल्ह्यातील लोकांकडून होते, म्हणून मी बातम्या देत नाही, असे ते म्हणाले. त्याच वेळी मी रिल वा व्हिडीओ काढत नाही. शो करत नाही. इतरांप्रमाणे व्हॉट्सॲपवर काही टाकत नाही अशा शब्दांत विरोधकांना कानपिचक्या देत इंदापूरची जनता फार हुशार आहे. कोणी काही बातम्या दिल्या, कोणी व्हॉट्सॲपला काही पाठवले तरी इंदापूरची जनता मीडिया, बातम्या व्हॉट्सॲपवर अवलंबून राहत नाही, असे क्रीडामंत्री भरणे म्हणाले.