पुणे -महाराष्ट्र विधानभवनात रमी खेळतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर टीकेच्या केंद्रस्थानी आलेले मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून, त्याऐवजी त्यांना क्रीडा आणि अल्पसंख्यांक विकास खाती देण्यात आली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत चर्चा करून गुरुवारी रात्री हा निर्णय घेतला.या निर्णयावर आज पुण्यात माध्यमांशी बोलताना माणिकराव कोकाटे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय तो मला मान्य आहे. दत्तामामा भरणे हे शेतकरी पुत्र आहेत. कृषी खातं त्यांच्याकडे गेल्यामुळे खात्याला योग्य न्याय मिळेल. गरज लागेल तेव्हा मी त्यांना मदत करायला तयार आहे," असं कोकाटे यांनी सांगितलं.
तसेच, आपण नाराज नसून खूश असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. “मी नाराज नाही, आय एम व्हेरी हॅपी,” अशा शब्दांत कोकाटे यांनी आपली भूमिका मांडली. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या असून, कोकाटेंनी दिलेल्या या प्रतिक्रियेने चर्चांना नवा रंग मिळाला आहे.दरम्यान, माणिकराव कोकाटे यांची कृषिमंत्रीपदाची आतपर्यंतची कारकीर्द खूपच वादग्रस्त आहे. सातत्याने शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधाने केल्याने ते टीकेचे धनी ठरले होते. अशातच पावसाळी अधिवेशनात विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडिओ वायरल झाला आणि त्यांना पदावरून हटवण्यात यावे, अशा मागणीने चांगलाच जोर धरला.