- भरत निगडे
नीरा : पुणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणे तुडुंब भरली आहेत. जिल्ह्यातील २६ धरणांपैकी १७ धरणे शंभर टक्के ओव्हरफ्लो झाली असून, ८ धरणे शंभरीच्या काठावर आहेत. फक्त एका धरणात ७० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण प्रकल्पीय उपयुक्त साठा २१७.९९ टीएमसी असलेल्या धरणांमध्ये ९९.९५ टक्के पाणी साठले असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लहर उसळली आहे. शहरी भागातील पिण्याच्या पाण्याची चिंता पुढील जूनपर्यंत तरी दूर झाली आहे.
पावसाळ्यातील सव्वाचार महिन्यांत जिल्ह्यात सरासरी ८६२ मिमी पावसाची अपेक्षा असताना ७४५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने जूनमध्ये काही धरणे ओव्हरफ्लो झाली होती. जुलैमध्ये पश्चिम पट्ट्यातील भात खाचऱ्यांमुळे धरणांत नव्याने पाण्याची आवक झाली. ऑगस्टमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे धरणे भरून वाहू लागली.
या धरणांमधून डाव्या-उजव्या कालव्यांना, विद्युतगृहांना आणि सांडव्याला पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे मुठा, पवना, भीमा, आरळा, इंद्रायणी, कानंदी, कुकडी, घोड व नीरा या नद्या दुथडी भरून वाहिल्या. सध्या विसर्ग कमी करण्यात आला असला तरी पावसाचा जोर कायम राहिला तर नद्यांमध्ये पुन्हा वाढ होऊ शकते.
गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांत केवळ १३२.४० टीएमसी (६६ टक्के) पाणीसाठा होता. यंदा मात्र दुप्पट साठा झाल्याने पाण्याची स्थिती सुधारली आहे. मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला धरणांत एक जूनपासून ७९.९४ टीएमसी नव्याने पाणी दाखल झाले आहे. नीरा खोऱ्यातील गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर धरणांत ४८.३०६ टीएमसी (९९.४५ टक्के) साठा आहे. कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड धरणांत ६७.९३ टीएमसी नव्याने साठले आहे. याशिवाय उजनीत ५३.५७ टीएमसी, मुळशीत १९.८७ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
ओव्हरफ्लो धरणांची यादी :
येडगाव, विसापूर, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, वडिवळे, आंध्रा, पवना, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवघर, भाटघर, वीर, नाझरे, उजनी ही १७ धरणे शंभर टक्के भरली आहेत.
९० टक्क्यांहून अधिक साठ्याची धरणे :
डिंभे : ९९.८५ टक्के
वडज : ९९.२५ टक्के
चिल्हेवाडी : ९८.७२ टक्के
मुळशी : ९८.५८ टक्के
कासारसाई : ९७.९५ टक्के
खडकवासला : ९६.८७ टक्के
घोड : ९६.३६ टक्के
पिंपळगाव जोगे : ९१.५० टक्के
सर्वांत कमी पाणीसाठा असलेले माणिकडोह धरण ७०.२४ टक्क्यांवर आहे.
शनिवार (दि. २०) सकाळी ८ वाजेपर्यंत धरण क्षेत्रातील पावसाची नोंद (मिमी) :
टेमघर : ३,२०३
वरसगाव : २,१२५
पानशेत : २,१२८
खडकवासला : ७९९
पवना : २,४८०
कळमोडी : १,३०१
भामा आसखेड : १,०५७
आंध्रा : १,४६०
नाझरे : ३००
गुंजवणी : २,३५३
भाटघर : ८११
नीरा देवघर : २,०९२
पिंपळगाव जोगे : ६०५
माणिकडोह : ६२२
वडज : ५१४
डिंभे : १,०२०
चिल्हेवाडी : ६६९
मुळशी : ३,६३६
वीर : २७७