पुणे : महिलांवरील वाढत्या अत्याचारासंदर्भात राज्य सरकार आरोपींवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा’(मकोका) लावण्याचा विचार करत आहे. ‘याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली असून, विधि व न्याय विभागाला याबाबत कायदेशीर तपासणी करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा रेणुसे मित्र परिवार यांच्या वतीने शनिवारी आयोजित केलेल्या ‘गुरुजन गौरव’ समारंभात ते बोलत होते. यावेळी उद्योजक अरुण फिरोदिया, ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर आणि ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांचा अजित पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. माजी महापौर अंकुश काकडे, दीपक मानकर, आयोजक अप्पा रेणुसे, विजय जगताप, अभय मांढरे, मोनिका मोहोळ आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘महिलांच्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे म्हणून सरकारची कठोर भूमिका असते. कायदे करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी प्रकरणे घडल्यानंतर आरोपी, तपास, चौकशी, पुरावे आदी न्यायालयीन प्रक्रियेत खटला सुरूच असतो. तोपर्यंत आरोपीवर ‘मकोका’सारखे कलम लावण्यासंदर्भात सरकार चाचपणी करत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सहकारीही सकारात्मक आहेत. त्यामुळे महिला अत्याचाराच्या प्रकरणात या कायद्याची अंमलबजावणी करता येणार का, याची तपासणी करण्याच्या सूचना राज्याच्या विधि व न्याय विभागाला केली आहे.’’
शास्त्रीय नृत्य आणि शास्त्रीय संगीत प्रत्येक शाळांमध्ये शिकवले जावे, पुण्यात शास्त्रीय नृत्यासाठी पुण्यात स्वतंत्र विद्यापीठ व्हावे. दिल्ली, बनारसच्या तोडीचे कथ्थक नृत्य पुण्यात होते. सन्मान हा केवळ सन्मान नसतो तर ती जबाबदारी असते. नृत्य क्षेत्रात मला जे काही करता येईल ते मी करीन. - शमा भाटे
काही करिअर हे केवळ नोकऱ्या नसताता, ते ध्येय आणि संधी असतात. प्रत्येक क्षेत्रात आज इलेक्ट्रॉनिक आहे. एआय हे सुद्धा इलेक्ट्रॉनिकच आहे. इलेक्ट्रॉनिक, बायोटेक्नॉलॉजी, व्हॅक्सिन, रिसायकलिंग या विषयाचा प्रत्येकाने अभ्यास करायला हवा. - अरुण फिरोदियाउद्याचे भवितव्य शिक्षण क्षेत्रावर अवलंबून आहे. सातत्याने शिकले पाहिजे, शिकणे कधी संपत नाही. त्यामुळे मला अजून खूप शिकायचे आहे. शिष्याकडे काय आहे, हे ज्याला कळते तो म्हणजे गुरू. खरा गुरू दगड बाजूला सारून शिल्प समोर आणतात. - विजय कुवळेकर