पुणे : जिल्हा प्रशासनाने गेल्या सहा महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या सेवादूत या उपक्रमातून महा-ई-सेवा केंद्र, सेतू केंद्र, सामायिक सुविधा केंद्रांमध्ये मिळणारे सर्व दाखले आता घरबसल्या ॲपवर क्लिक करून मिळविता येत आहेत. ही सुविधा शहरातील तब्बल ५३१ केंद्रांमधून दिली जात असली तरी या सुविधेचा लाभ आतापर्यंत केवळ ६२६ पुणेकरांनी घेतला आहे. यावरून या सुविधेला पुणेकरांनी थंड प्रतिसाद दिला आहे. या सुविधेत आतापर्यंत केवळ ५३५ दाखले घरपोच देण्यात आले आहेत. त्यात सर्वाधिक ३०६ उत्पन्नाचे दाखल्यांचा समावेश आहे. प्रचार व प्रसिद्धी कमी पडल्याने नागरिकांना याबाबत कल्पनाच नसल्याचे चित्र आहे.
शहरांमध्ये नोकरदारांचे कामाचे वेळापत्रक व्यग्र असल्याने प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो. अनेक नागरिकांना पाल्यांसाठी दाखले काढायचे असतात. मात्र, सामायिक सुविधा केंद्र, ई-सेवा केंद्र, सेतू सेवा केंद्र या ठिकाणी जाण्यास वेळ नाही. नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन आता जिल्हा प्रशासनाने मार्चपासून घरबसल्या दाखले देण्याचे सुरू केले आहे. यासाठी दाखलेदेखील ॲपवरून काढता येत आहेत. जिल्हा प्रशासनाने ही सेवा देण्यासाठी सेवादूत नेमले आहेत. पुणे शहर व जिल्ह्यातील सर्व ई सेवा केंद्र, सेतू केंद्र व सामायिक सुविधा केंद्रांमधील कर्मचारी सेवादूत म्हणून काम करत आहेत.
जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम फेब्रुवारीत सुरू केला. शहरी भागात या उपक्रमाला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा होती. मात्र, गेल्या सहा महिन्यांत आतापर्यंत केवळ ६२६ पुणेकरांनी याचा लाभ घेतल्याचे आकेडवारीवरून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत ५३४ दाखल्यांचे वितरण या सेवादूतांमार्फत करण्यात आले आहे. योजनेचा प्रचार व प्रसार कमी प्रमाणात झाल्याने प्रतिसाद कमी मिळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसेच ही सुविधा पुरविणाऱ्या केंद्रांमध्येही याबाबत अद्याप काही प्रमाणात संभ्रम आहे. ही सेवा पुरविण्यासाठी काम करणारे गरजू पुढे येत नसल्याचे चित्र आहे.
शहरातील सेवादूतची स्थिती
सहभागी केंद्र : ५३२
लाभार्थी नागरिक : ६२६
ॲपमधील आतापर्यंतच्या बुकिंग : ७१४
दिलेले एकूण दाखले : ५३५
विविध दाखल्यांची संख्या
उत्पन्नाचा दाखला : ३०६
अधिवास (डोमिसाइल) : १२६
तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र : ३२
प्रतिज्ञापत्र साक्षांकित करणे : २२
नॉन क्रीमी लेअर : १५
जातीचे प्रमाणपत्र : ९
ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र : १७
शेतकरी असल्याचा दाखला : २
आदिवासी दाखला : २
अधिकार अभिलेखाची प्रमाणित प्रत : १
अल्पभूधारक दाखला : १
ऐपतीचा दाखला : २