पुणे : आमच्या पक्षाच्या अध्यक्षांसमोर त्यांनी पत्ते टाकायला नको होते, ते काही रमी खेळत नव्हते. तसेच त्यांनी अजित पवार यांच्याविषयी काही अपशब्द वापरल्याने आमचे कार्यकर्ते चिडले व तो प्रकार झाला, असे मत छावा कार्यकर्त्यांच्या मारहाण प्रकरणावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. थोडी चूक त्यांची होती व थोडी आमचीही होती. राजकारणात असे होते व त्याचा त्रास नेत्यांना भोगावा लागतो, असेही ते म्हणाले.
भुजबळ गुरुवारी दुपारी पुण्यात मुक्कामी आले होते. शुक्रवारी सकाळी पत्रकारांबरोबर बोलताना त्यांनी छावा कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणावर बोलताना दोन्ही बाजूंची चूक होती, असे सांगितले. राजकारणात कार्यकर्त्यांनी संताप आवरायला शिकले पाहिजे. भाषा सभ्यच हवी. त्यांच्याकडून बोलताना काही अपशब्द वापरले गेले, असे कार्यकर्ते सांगतात. त्यामुळे युवक कार्यकर्त्यांना संताप आला व मारहाणीचा प्रकार घडला. अजित पवार हे घाडगे यांची भेट घेत असतील तर ते चांगलेच आहे, असे भुजबळ म्हणाले. हा वाद जेवढ्या लवकर मिटेल तेवढे चांगले, असेही ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले. राजकारणात असे आरोप होतच असतात. त्यावर एकच उपाय असतो व तो म्हणजे न्यायालयात जाणे. तिथे आरोपांमध्ये तथ्य नाही हे समोर येतेच. मुंडे यांच्याबाबतीत ते झाले असेल. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचे किंवा नाही हा निर्णय अजित पवार यांनी घ्यायचा आहे. कामांची बिले थकल्याने हर्षद पाटील या ठेकेदाराने आत्महत्या केल्याचे समजले. त्यावर अजित पवार स्पष्टपणे बोलले आहेत, असे सांगत भुजबळ यांनी त्यावर काहीही बोलणे टाळले.