बारामतीत लक्ष्मण हाके यांच्यासह १४ ओबीसी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 09:24 IST2025-09-13T09:23:41+5:302025-09-13T09:24:38+5:30
१४ जणांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. यामध्ये बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांचा देखील समावेश आहे.

बारामतीत लक्ष्मण हाके यांच्यासह १४ ओबीसी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
बारामती : बारामती पोलिसांनी ५ सप्टेंबर रोजी झालेल्या ओबीसी एल्गार मोर्चासंदर्भात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह १४ जणांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. यामध्ये बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव काळुराम चौधरी यांचा देखील समावेश आहे.
दि. ५ रोजीच्या परवानगी नाकारल्यावर मोर्चा काढल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक महेश माने यांनी फिर्याद दिली. त्यानुसार जिल्ह्यात बेकायदेशीर जमाव जमवून आंदोलन, उपोषण, मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतर बारामतीत दि. ५ रोजी मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे आंदोलकांनी पोलिस कायदा कलमाचा भंग केल्याने चंद्रकांत वाघमोडे (रा. माळेगाव, ता. बारामती), अमोल सातकर (रा. जळोची, बारामती), पांडुरंग मेरगळ (रा. रावणगाव, ता. दौंड), नवनाथ पडळकर (रा. बारामती), बापूराव सोलनकर (रा. ढेकळवाडी, ता. बारामती), किशोर मासाळ (रा. बारामती), किशोर हिंगणे (रा. पाटस रोड, बारामती), गोविंद देवकाते (रा. बारामती), विठ्ठल देवकाते (रा. निरावागज, ता. बारामती), काळुराम चौधरी (रा. आमराई, बारामती), बापू कौले (रा. सुपा, ता. बाारामती), मंगेश ससाणे (रा. हडपसर), लक्ष्मण हाके (रा. सांगोला), जी. बी. गावडे (रा. मळद, ता. बारामती) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी ओबीसी समाजाकडून नवनाथ पडळकर, चंद्रकांत वाघमोडे, बापूसाहेब सोलनकर, जी. बी. गावडे, गोविंद देवकाते, विठ्ठल देवकाते, किशोर हिंगणे, काळुराम चौधरी, अमोल सातकर, असिफ खान आदींनी पत्रकार परिषद घेतली. मोर्चा शांततेत कायदेशीर मार्गाने काढण्यात आला. तरी देखील मनोज जरांगे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट पोलिसांनी आकसाने आमच्यावर गुन्हा दाखल केेल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सांगण्यावरून हा गुन्हा दाखल झाला असल्याचे यावेळी बसपा नेते काळुराम चौधरी म्हणाले. शिवाय पवार यांनी घेतलेल्या गोपनीयतेची शपथ आणि त्यांच्या पदाचा त्यांनी भंग केला आहे. या विरोधात आपण त्यांचं मंत्रिपद आणि आमदारकी रद्द व्हावी, यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले. दखल घेतली गेली नाही तर दावा दाखल करण्याचा इशारा चौधरी यांनी दिला. गुन्हा दाखल झालेले कार्यकर्ते स्वतःहून सोमवारी (दि. १५) पोलिस ठाण्यात हजर राहून अटक करवून घेणार आहेत. पोलिसांनी आम्हाला अटक करून दाखवावीच असे आव्हान ओबीसी समाजाने दिले आहे.