- हिरा सरवदेपुणे : होर्डिंग उभारण्याच्या नियमांना तिलांजली देऊन उभारलेल्या अनेक धोकादायक होर्डिंगला महापालिकेने परवानगी दिल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळते. एखादे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडल्यानंतरच महापालिका प्रशासनाकडून पाहणी, सर्वेक्षण आणि कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यामुळे पुणेकरांना मृत्यूच्या सापळ्यांमधून वाट काढत पुढे जावे लागते.महापालिका हद्दीत होर्डिंग उभारण्यासाठी आकाश चिन्ह व परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. होर्डिंगसाठी शासनाने निश्चित केलेल्या नियमांचे पालन करणे होर्डिंग मालकांवर बंधनकारक असते.
अधिकृत होर्डिंगला महापालिकेकडून दिलेला नंबर व एजन्सीचे नाव असलेला पिवळ्या रंगाचा लहान नामफलक लावला जातो. अशा होर्डिंग परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करणे बंधनकारक आहे; मात्र महापालिकेची परवानगी न घेताच अनधिकृतपणे होर्डिंग उभारले जातात. अशा अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेकडून कारवाई केली जाते, ते होर्डिंग जमीनदोस्त केले जाते.अनेकवेळा राजकीय वरदहस्त आणि अधिकाऱ्यांशी साटेलोटे यामुळे अनधिकृत होर्डिंगवर कारवाई होत नाही. अशा अनधिकृत होर्डिंगच्या माध्यमातून लाखो रुपये मिळवले जातात; मात्र महापालिकेच्या तिजोरीत एक पैसाही पडत नाही.