पुणे - राजगड तालुक्यातील करंजावणे गावात तब्बल १० ट्रॅक्टर चिखलात अडकून रुतल्याची घटना घडली आहे. रावसाहेब कांबळे यांच्या शेतात भात लावणीसाठी चिखलणीचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. भातलावणीसाठी शेतात चिखलणी करत असताना एक ट्रॅक्टर चिखलात अडकला.
त्याला बाहेर काढण्यासाठी आलेला दुसरा ट्रॅक्टरही अडकला. यानंतर एकामागून एक असे नऊ ट्रॅक्टर आले आणि ते सुद्धा चिखलात रुतत गेले. परिणामी तब्बल १० ट्रॅक्टर शेतात अडकून पडले होते.या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. जवळपास ५ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने ट्रॅक्टर बाहेर काढण्यात यश आले. यावेळी चार ट्रॅक्टर एकत्र उभे करून दोरखंडांच्या साहाय्याने एकेक ट्रॅक्टर बाहेर काढण्यात आले. सध्या राजगड तालुक्यात पावसाचा जोर असल्याने भात लावणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र, या प्रकारामुळे लावणीत विलंब झाला. १० ट्रॅक्टर चिखलात रुतल्याची घटना परिसरात चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.