- दुर्गेश मोरे
पुणे : ग्रामीण भागामध्ये बिबट्याची मोठी दहशत आहे. या दहशतीत लोकांचे संघर्षमय जगणे सुरू आहे. त्यातच आता आणखी एका समस्येला लोकांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपासून गावागावांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाले असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत तब्बल १८ हजार लोकांना कुत्र्याने चावा घेतला आहे. दरम्यान, महानगरपालिका, नगरपालिका हद्दीत ज्याप्रमाणे भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रण करण्यासाठी यंत्रणा आहे, तशी यंत्रणा जिल्हा परिषदेकडे नसल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भटकी कुत्री हा गंभीर प्रश्न बनत चालला आहे.
ग्रामीाण भागामध्ये बिबट्याबराेबरच आता भटक्या कुत्र्यांची समस्या लोकांना भेडसावू लागली आहे. त्यांचा उपद्रव इतका वाढला आहे की, कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात भटकी कुत्री समूहाने फिरत असतात. रस्त्यावर पडलेले खाद्यपदार्थ खाण्यावरून त्यांच्यात भांडणे लागतात. रस्त्यावर गोंधळ घालणार्या या कुत्र्यांचा वाहने व पादचाऱ्यांना त्रास होतो. परिसरातील नागरिक त्यांना हाकलण्यासाठी सरसावतात. त्यामुळे कधी कधी कुत्री चवताळून नागरिकांच्या अंगावर धावून जातात व चावा घेतात. भटके श्वान झुंडीने फिरत असतात. रात्रीच्या किंवा पहाटेच्या वेळी कामावरून येणाऱ्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात. बऱ्याचदा किशोरवयीन मुले प्राण्यांची खोड काढतात, अशा वेळी प्राणी आक्रमक होऊन चावा घेत असल्याचे आरोग्य विभागाच्या नोंदीवरून समोर आले आहे.
जिल्ह्यात जानेवारी २०२५ ते सप्टेंबर २०२५ या कालावधीमध्ये तब्बल १८ हजार १५१ जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सर्वाधिक घटना हवेली तालुक्यात घडल्या असून, आतापर्यंत तीन हजार २८७ नागरिकांना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ दौंड दोन ४२८, शिरूर दोन हजार जणांना चावा घेतल्या नोंद आहे. भोर आणि मुळशी तालुक्यामध्ये श्वासदंशच्या घटना कमी आहे. तिथे अनुक्रमे ७०५ आणि ६६८ इतक्या घटनांची नोंद आहे.
निर्बिजीकरणाची व्यवस्था नाही
महानगरपालिका आणि नगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांना पकडून काही वेळा ग्रामीण भागामध्ये सोडले जाते. पूर्वी असे प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायचे आता कमी झाले असले, तरी तसे प्रकार घडत आहे. त्याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर निर्बिजीकरणाची कोणतीच व्यवस्था नसल्याने दिवसेंदिवस त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
डॉक्टर आहे पण, व्यवस्था नाही
भटक्या कुत्र्यांची समस्या सर्वत्रच आहे. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणांवरील भटकी कुत्री त्वरित हटवून, त्यांची नसबंदी करून त्यांना निवारागृहात हलवावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिले आहेत. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रामध्ये पूर्वीपासून अशी यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, ग्रामपंचायत पातळीवर पशुसंवर्धन विभाग कार्यरत असला, तरी या भटक्या कुत्र्यांना पकडण्याची यंत्रणाचा अस्तित्वात नाही. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पातळीवरही यासंदर्भात कोणत्याही संस्थेला आतापर्यंत काम दिले गेले नसल्याचे वास्तव समोर आले. त्यामुळे डॉक्टर असूनही त्यांना भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करता येत नाही.
निवारा केंद्र उभारण्याचे मोठे आव्हान
श्वानदंशाच्या वाढणाऱ्या घटना पाहता ग्रामीण भागातही ग्रामपंचायत पातळीवर ठोस उपायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची नसबंदी हा एकमेव अधिकृत पर्याय आहे. पण, त्यासाठी कुत्रे पकडणारी संस्था नेमणे, त्यानंतर त्यांच्या शस्त्रक्रिया करणे, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नसबंदी नंतर लसीकरण करून त्यांना निवारागृहात ठेवणे, अशी एकूण प्रक्रिया राबवावी लागणार आहे. त्यातील सर्वात अवघड काम म्हणजे भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केद्र उभारणे हे आहे. कारण, केवळ निवारा उपलब्ध करून देऊन चालणार नाही, तर त्यांची एक प्रकारे काळजी घेण्याचे आव्हान देखील असणार आहे.
तालुकानिहाय श्वानदंशाच्या घटना
आंबेगाव १०१२
बारामती १२८४
भोर ७०५
दौंड २४२८
हवेली ३२८७
इंदापूर १३६४
जुन्नर १५२०
खेड १४५१
मावळ १४९३
मुळशी ६६८
पुरंदर ८२०
शिरुर २००२
एकूण १८,१५७