पुणे : नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने भाडेकरार करण्यासाठी आता डोळ्यांच्या बुबुळांच्या आधारे आधार पडताळणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे हातांच्या ठशांचा वापर न करताही भाडेकरार होणार असल्याने ज्येष्ठांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही सुविधा लवकरच विवाह नोंदणीसाठीदेखील वापरण्याचे नियोजन नोंदणी मुद्रांक विभागाने केले आहे.
भाडेकरार करण्यासाठी सध्या २.० ही संगणकप्रणाली वापरली जात आहे. ही प्रणाली संथगतीने सुरू असल्याने भाडेकरार करण्यासाठी विलंब लागत असून, एका करारासाठी किमान एक ते दीड तासाचा कालावधी असल्याच्या तक्रारी असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्सने नोंदणी मुद्रांक विभागाकडे केल्या होत्या. अर्ज भरून कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन किंवा पैसे जमा करूनही हाताच्या ठशांअभावी करार पूर्ण होत नाही.या प्रणालीवर अनेकदा तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचे हाताचे ठसे काही कारणास्तव उमटत नाहीत. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत होता. करार होत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना त्यासाठी दुसऱ्याला कुलमुखत्यारपत्र द्यावे लागत होते. यातही फसवणूक होण्याची शक्यता असल्याने त्यालाही पर्याय असावा, अशी मागणी होत होती.
असोसिएशनने ज्येष्ठ नागरिकांसाठी डोळ्यांच्या बुबुळाच्या प्रतिमेचा वापर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यापूर्वीच केली होती. त्यानुसार, नोंदणी मुद्रांक विभागाच्या संगणक विभागाने भाडेकरार करताना आता यामध्ये बदल केला आहे. हाताचे ठसे न येणाऱ्या तरुणांसह ज्येष्ठांना आधार पडताळणी होत नव्हती. त्यामुळे पैसे वाया जात होते. भाडेकरारासाठी हा प्रयोग सुरू केला असून, यापुढे व विवाह नोंदणीसाठी हा पर्याय स्वीकारण्यात येणार आहे, अशी माहिती नोंदणी उपमहानिरीक्षक अभयसिंह मोहिते यांनी दिली.
डोळ्याच्या बुबुळांच्या आधारे आधार पडताळणी सुरू करण्यात आली आहे. आधार पडताळणीसाठी हाताच्या ठशांचाही वापर केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. - सचिन शिंगवी, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स