पुण्यातीलच युवा शिल्पकाराने साकारला थोरल्या बाजीरावांचा पुतळा

By राजू इनामदार | Updated: July 5, 2025 14:17 IST2025-07-05T14:16:44+5:302025-07-05T14:17:10+5:30

विपुल खटावकर: शिल्पाकृतीत उतरलेत अजेय योद्ध्याचे सगळे भाव

pune news a young sculptor from Pune created a statue of the great Bajirao | पुण्यातीलच युवा शिल्पकाराने साकारला थोरल्या बाजीरावांचा पुतळा

पुण्यातीलच युवा शिल्पकाराने साकारला थोरल्या बाजीरावांचा पुतळा

पुणे: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) शुक्रवारी (दि. ४) सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण होत असलेला थोरल्या बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा पुण्यातीलच युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी तयार केला आहे. बाजीरावांचा हा पुण्यातील तिसरा अश्वारूढ पुतळा असला तरी पुढील दोन पाय हवेत उंचावलेल्या अश्वावर आरूढ असलेला हा पहिलाच पुतळा आहे.

अजेय योद्ध्याची सगळी वैशिष्ट्ये पुतळ्यात दृग्गोचर झाली आहेत. शत्रूवर चालून जाण्याचा आवेश अश्वापासून ते भालाफेक करणाऱ्या बाजीरावांच्या हातापर्यंत संपूर्ण शिल्पाकृतीत दिसतो. डोक्याला पगडीच्या आत मंदिल, अंगात चिलखत, कमरेला समशेर अशा शस्त्रांनी सज्ज असलेले बाजीराव आपल्या अश्वासह जणू आताच झेप घेतील, इतके जीवंत साकारले गेले आहेत. मातीच्या पुतळ्यापासून ते ४ टनांच्या धातूकामातील १३ फूट उंचीच्या पुतळ्याच्या ओतकामासह सगळे काम पुण्यातच झाले आहे. सलग ६ महिने हे काम सुरू होते. पुण्यातील कलाविश्वासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे.

विपुल हा खटावकर घराण्यातील तिसऱ्या पिढीचा शिल्पकार. त्याचे आजोबा डी. एस. खटावकर हे पुण्यातील त्यांच्या पिढीतील प्रसिद्ध शिल्पकार. ते अभिनव कला महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांचा शिल्पकलेचा वारसा त्यांचे चिरंजीव विवेक यांना मिळाला. आता विवेक यांचा मुलगा विपुल शिल्पकार म्हणून काम करत आहे. पुतळ्याचे धातूकामातील ओतकाम हे कोणत्याही शिल्पकारासाठी अतिशय आव्हानाचे काम असते. या कामात विपुल याने कौशल्य मिळवले आहे.

हे काम मिळाले त्याचवेळी ते किती आव्हानात्मक आहे याची जाणीव झाली. त्यानंतर बाजीरावांसंबंधी जे काही होते ते जवळपास सगळे वाचले. त्यातून जबाबदारी आणखी वाढली. आयुष्यात एकही लढाई न हरलेल्या बाजीरावांच्या व्यक्तिमत्त्वामधील ‘अजेय’पण पुतळ्यात आणण्याचा प्रयत्न मी केला. पुतळ्याला लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पसंती मिळाली, त्यावेळी झालेला आनंद अवर्णनीय आहे. आता पुतळ्याची प्रतिष्ठापना होत असल्याचे समाधान फार मोठे आहे. - विपुल खटावकर, शिल्पकार

Web Title: pune news a young sculptor from Pune created a statue of the great Bajirao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.