चाकण : चाकण नगर परिषदेच्या विकासकामांच्या निविदा प्रक्रियेवरून दोन ठेकेदारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना मंगळवारी (दि. १६) नगर परिषदेसमोर घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली असून, निविदा प्रक्रियेत गैरव्यवहाराच्या संशयावरून ही बाचाबाची झाल्याची चर्चा आहे.
चाकण नगर परिषदेत सध्या प्रशासकीय राजवट असून, लाखो रुपयांच्या विकासकामांसाठी ऑनलाइन बंद निविदा प्रक्रिया राबवली जाते. या निविदा परवानाधारक ठेकेदार भरतात. मात्र, शहरातील काही ठराविक ठेकेदारांनाच ही कामे मिळत असल्याचा आरोप आहे. यामागे पालिकेतील काही अधिकारी आणि माजी नगरसेवकांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
निविदा प्रक्रियेत एका ठेकेदाराला जास्त कामे मिळाल्याचा संशय दुसऱ्या गटातील ठेकेदारांना होता. याबाबत माहिती मिळवण्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज दाखल केला. याच मुद्द्यावरून मंगळवारी नगर परिषदेसमोर पाच ते सहा ठेकेदार समोरासमोर आले. ‘अर्ज का दाखल केला?’ यावरून वाद वाढला आणि त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेनंतर दोन्ही गटातील ठेकेदारांनी चाकण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.
ठेकेदारांमध्ये दोन गट, तीव्र स्पर्धा
चाकण नगर परिषदेत विकासकामांसाठी ठराविक ठेकेदारांचीच उठबस असल्याचे दिसून येते. यातील काही ठेकेदारांना लाखो रुपयांची कामे मिळत असल्याने ठेकेदारांमध्ये दोन गट पडले आहेत. यातून तीव्र स्पर्धा निर्माण झाली असून, आजच्या मारहाणीच्या घटनेमागे हेच कारण असल्याची चर्चा शहरात आहे.
नागरिकांमध्ये संताप
नगर परिषदेच्या समोरच अशी घटना घडल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि समान संधी मिळावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणी चाकण पोलिस ठाण्याकडून तपास सुरू असून, पुढील कारवाईबाबत उत्सुकता आहे.