कात्रज - आज सकाळी कात्रजमधील खोपडे नगर येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये मोठी दुर्घटना टळली. सुट्टीवर असलेले कोथरूड अग्निशमन केंद्राचे जवान योगेश अर्जुन चव्हाण यांनी प्रसंगावधान राखत चार वर्षांच्या चिमुकलीचा जीव वाचवला. अधिकच्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजून ६ मिनिटांनी सोनवणे बिल्डिंगमध्ये राहणारे उमेश सुतार हे अचानक जोरजोरात ओरडताना दिसले. त्यांचा आवाज ऐकून योगेश चव्हाण आपल्या गॅलरीत आले आणि त्यांनी पाहिले की भाविका चांदणे (वय ४) नावाची एक मुलगी तिसऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून अर्धवट लटकलेली होती. ही दृश्ये पाहून योगेश चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता इमारतीच्या दिशेने धाव घेतली. तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्यावर त्यांनी लक्षात आलं की घराला कुलूप आहे आणि मुलगी घरात एकटीच आहे. त्या मुलीची आई दुसऱ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी बाहेर गेली होती.योगेश चव्हाण तितक्यातच तिच्या आईला गाठले व तिला दरवाजा उघडायला लावला. तत्काळ बेडरूममध्ये धाव घेत त्यांनी खिडकीत अडकलेल्या मुलीला आत खेचून घेतलं आणि तिचा जीव वाचवला. हा संपूर्ण प्रकार अतिशय धक्कादायक असला, तरी जवान योगेश चव्हाण यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली. नागरिकांनी त्यांच्या या शौर्याचे आणि तत्परतेचे मोठ्या प्रमाणावर कौतुक केले आहे. या घटनेचा व्हिडिओ चर्चेत आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.