पुणे : कोणत्याही मोठ्या शहरातील सार्वजनिक वाहतूक ही तेथील गरीब प्रवाशांसाठी जीवनवाहिनी असते. पुणे शहराची अशीच जीवनवाहिनी असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएल) कंपनीच्या अध्यक्षपदी ७ वर्षात ८ वेळा बदल करून सरकार पुणेकर गरीब प्रवाशांची चेष्टा करत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे.
‘पीएमपीएल’च्या अध्यक्षपदी सरकारने नुकतीच नवी नियुक्ती केली. त्यावरून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, दीपा मुधोळ-मुंडे यांना वर्षभरच काम करण्याची संधी मिळाली. त्या कालावधीत त्यांनी सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेत चांगले बदल केले. सरकारने एका वर्षातच त्यांची बदली केली व पंकज देवरे यांची नियुक्ती केली.
मागील ७ वर्षांत नयना मुंडे, डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. कुणाल खेमणार, लक्ष्मीनारायण मिश्रा, ओमप्रकाश बकोरिया, सचिंद्र प्रताप सिंह, डॉ. संजय कोलते असे ७ चांगले प्रशासकीय अधिकारी त्यांचा सेवाकाळ पूर्ण होण्याच्या अगोदरच बदलण्यात आले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे १० लाख प्रवासी दररोज ‘पीएमपी’ने प्रवास करतात. या प्रवाशांना सुलभ सेवा मिळणे गरजेचे आहे. मात्र, सरकारला ते महत्त्वाचे वाटत नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्यांना त्यांच्याकडून प्राधान्य दिले जाते.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांमागे ठेकेदारांशी गुंतलेले हितसंबंध कारणीभूत आहेत, असा आरोप जोशी यांनी केला. त्यांच्या या खेळात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील गरीब प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो आहे. ही कंपनी बंद पडावी व खासगी कंपन्यांना संधी मिळावी, असाच डाव यामागे असल्याची टीका जोशी यांनी केली.